UPSC CSE Result Akanksha Singh AIR 301 Controversy: केंद्रीय लोकसेवा आयोगाने ६ मार्च २०२६ रोजी नागरी सेवा परीक्षा २०२५ चा अंतिम निकाल जाहीर केल्यानंतर ३०१ रँकबद्दल (AIR 301) संदर्भात एक अनोखा वाद समोर आला. आकांक्षा सिंह नावाच्या दोन वेगवेगळ्या महिला उमेदवारांनी समान रँक (३०१) आणि समान रोल नंबर (०८५६७९४) असल्याचा दावा केल्याने सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला.

खरी उमेदवार कोण?

बिहार आणि उत्तर प्रदेशातील दोन उमेदवारांनी केलेल्या या परस्परविरोधी दाव्यांमुळे परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या प्रकरणाची दखल घेत ‘यूपीएससी’ने अधिकृत स्पष्टीकरण जारी करून संपूर्ण गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न केला. आयोगाने स्पष्ट केले की नागरी सेवा परीक्षा (मुख्य) २०२५ मध्ये AIR 301 मिळवणारी उमेदवार आकांक्षा सिंग हीच आहे. आयोगाच्या अधिकृत नोंदीनुसार संबंधित उमेदवाराची माहिती पुढीलप्रमाणे आहे :

  • नाव: आकांक्षा सिंग
  • रोल नंबर: ०८५६७९४
  • वडिलांचे नाव: रणजित सिंग
  • आईचे नाव: नीलम सिंग
  • पत्ता: अभयपूर गाव, जिल्हा गाझीपूर, उत्तर प्रदेश

आयोगाने सांगितले की त्यांच्या अधिकृत नोंदींमध्ये केवळ याच उमेदवाराला ३०१ व्या क्रमांकावर यशस्वी घोषित करण्यात आले आहे. सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमध्ये पसरलेल्या अफवा थांबवण्यासाठी ही माहिती सार्वजनिक करण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे.

नेमका वाद काय होता?

या प्रकरणात दोन वेगवेगळ्या राज्यांतील उमेदवारांनी AIR 301 चा दावा केला होता. एक उमेदवार उत्तर प्रदेशातील गाझीपूर/वाराणसी परिसरातील असल्याचे सांगितले जात होते, तर दुसरी उमेदवार बिहारमधील आरा येथील असल्याचा दावा करण्यात आला होता. बिहारमधील आकांक्षा सिंह यांनी माध्यमांना मुलाखती देत AIR 301 मिळाल्याचा दावा केला होता. दुसरीकडे गाझीपूरच्या रहिवासी आणि व्यवसायाने स्त्रीरोगतज्ज्ञ असलेल्या डॉ. आकांक्षा सिंग यांनी त्यांच्या बाजूने प्रवेशपत्र आणि इतर कागदपत्रे सादर केली. त्यांनी स्वतःला खरी उमेदवार असल्याचा दावा करत रोल नंबर आणि कागदपत्रे सार्वजनिक केली.

बारकोडमुळे उघड झाला फरक

या वादाचा केंद्रबिंदू रोल नंबर ‘०८५६७९४’ होता. तपासात असे दिसून आले की गाझीपूरच्या उमेदवाराच्या प्रवेशपत्रावरील बारकोड स्कॅन केल्यावर रोल नंबर ‘०८५६७९४’ दिसत होता, जो अधिकृत निकालाशी जुळतो. मात्र बिहारमधील उमेदवाराच्या प्रवेशपत्रावर जरी रोल नंबर ‘०८५६७९४’ छापलेला असला, तरी बारकोड स्कॅन केल्यावर ‘०८५६५६९’ असा वेगळा क्रमांक दिसत होता. त्यामुळे कागदपत्रांच्या सत्यतेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. ‘यूपीएससी’च्या अधिकृत स्पष्टीकरणानंतर आता हा वाद स्पष्ट झाला असून AIR 301 वर निवड झालेली उमेदवार उत्तर प्रदेशातील गाझीपूरची आकांक्षा सिंग असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.