Rajeshwari Suve M UPSC AIR 2 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) २०२५ च्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला असून या प्रतिष्ठित परीक्षेत राजेश्वरी सुवे एम. हिने अखिल भारतीय क्रमांक दोन मिळवला आहे. यावर्षी एकूण ९५८ उमेदवारांची निवड झाली असून त्यामध्ये राजेश्वरी ही सर्वाधिक गुण मिळवणारी महिला उमेदवार ठरली आहे. या परीक्षेत अनुज अग्निहोत्री यांनी पहिला क्रमांक पटकावला, तर आकांश धुल्ल यांनी तिसरा क्रमांक मिळवला.
मदुराईची राजेश्वरी देशात दुसरी
राजेश्वरी सुवे एम ही मूळची तामिळनाडू राज्यातील मदुराई जिल्ह्यातील वाडीपट्टी येथील रहिवासी आहे. सध्या ती तामिळनाडू सरकारच्या अंतर्गत दिंडीगुल जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी (प्रशिक्षणार्थी) म्हणून कार्यरत आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे तिच्या कुटुंबासह संपूर्ण राज्यात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजेश्वरी यांनी देशात दुसरा क्रमांक मिळवला आहे.
अभियांत्रिकीच्या पदवीनंतर तयारी सुरू
राजेश्वरीने आपले शालेय शिक्षण तामिळनाडू राज्य मंडळातून पूर्ण केले. त्यानंतर तिने २०१८ साली चेन्नई येथील वेल टेक मल्टी-टेक इंजिनिअरिंग कॉलेजमधून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी या शाखेत बीई पदवी मिळवली. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने नागरी सेवेत प्रवेश करण्याचे ध्येय निश्चित केले आणि यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.
पाच वेळा दिली परीक्षा
राजेश्वरीचा यशाचा प्रवास सोपा नव्हता. तिने यूपीएससीची पाच वेळा पूर्व परीक्षा दिली आणि अनेक वेळा अपयशाचा सामना केला. मात्र, वारंवार अपयश येऊनही तिने हार मानली नाही आणि सातत्याने अभ्यास सुरू ठेवला. यापूर्वी तिने भारतीय वन सेवा (IFS) परीक्षेलाही बसली होती. यावेळी मुख्य परीक्षेसाठी तिने समाजशास्त्र हा पर्यायी विषय निवडला आणि त्याचा तिला मोठा फायदा झाला.
कुटुंबाचा मोठा वाटा
राजेश्वरीच्या यशामागे तिच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. तिचे वडील स्वतःचा व्यवसाय करतात, तर तिची आई तामिळनाडूतील एका सरकारी संस्थेत सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे आणि स्वतःच्या चिकाटीमुळे राजेश्वरीने अखेर यूपीएससीमध्ये मोठे यश मिळवले आहे.
