UPSC Success Story of IAS Shweta Bharti: कोणताही व्यक्ती ९-१० तासांच्या कामानंतर थकून जाताो. घरी परत येईपर्यंत ते इतके दमलेले असतात की, त्यांना दुसरे काही करण्याची इच्छा किंवा ताकद उरत नाही. मात्र, आज आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत, त्यांनी या सगळ्या मर्यादा ओलांडल्या. दिवसाचे ९ तास काम करूनही त्यांनी आयएएस अधिकारी बनण्याचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. त्यांच्या खांद्यावर जबाबदाऱ्यांचे मोठे ओझे होते, पण आयएएस होण्याच्या ध्यासाने त्यांना कधीच हार मानू दिली नाही. अखेर त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ त्यांना मिळाले.
९ तासांची नोकरी अन् यूपीएससी परीक्षेची तयारी
“कठोर परिश्रमाचे फळ नक्की मिळते,” असे म्हणतात, आणि आयएएस अधिकारी श्वेता भारती यांच्या बाबतीत हे अगदी खरे ठरले. मर्यादित वेळ असूनही त्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर यश संपादन केले. दररोज ऑफिसला जाणे, प्रवास करणे आणि ९ तासांची नोकरी सांभाळल्यानंतर अभ्यास करणे हे मोठे आव्हान होते. यूपीएससीसारख्या कठीण परीक्षेची तयारी करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, जबाबदाऱ्यांमुळे नोकरी सोडणे शक्य नसतानाही त्यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार कायम ठेवला.
श्वेता भारती यांचे शिक्षण
श्वेता भारती यांचे शालेय शिक्षण पाटणा येथे झाले. बारावीनंतर त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि भागलपूर येथून इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी बीपीएससी परीक्षा दिली आणि ६५ व्या रँकसह उत्तीर्ण होत जिल्हा कार्यक्रम अधिकारी पद मिळवले.
नोकरी करत अभ्यास, अखेर यश मिळाले
नोकरी करत असतानाच त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू ठेवली. २०२१ मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली आणि ३५६ वा रँक मिळवत यश मिळवले. त्यानंतर त्यांची बिहारमधील भागलपूर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली.
श्वेता भारती यांची ही यशोगाथा जिद्द, मेहनत आणि वेळेच्या योग्य नियोजनाचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी सिद्ध करून दाखवले की, मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी परिस्थिती नव्हे, तर आत्मविश्वास आणि चिकाटी महत्त्वाची असते.
