IAS Priya Rani Success Story: “तुम्ही सुरुवात का केली होती, हे नेहमी लक्षात ठेवा,” हा यशाचा मंत्र जपत बिहारच्या एका छोट्याशा गावातील तरुणीने देशातील सर्वात कठीण मानली जाणारी यूपीएससी परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली आहे. कुरकुरी सारख्या सुविधांच्या अभाव असलेल्या गावातून येणाऱ्या प्रिया राणीने ६९वी रँक मिळवून आयएएस अधिकारी बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे.
गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून आव्हानात्मक मार्ग निवडला
प्रियाचे प्राथमिक शिक्षण गावात झाले, मात्र पुढील शिक्षणासाठी तिच्या कुटुंबाने तिला पाटणा येथे पाठवले. रांची येथील BIT मेसरा येथून अभियांत्रिकीची पदवी घेतल्यावर तिची निवड बेंगळुरूमधील एका नामांकित खाजगी कंपनीत झाली. नोकरी उत्तम होती, पगारही चांगला होता, मात्र प्रियाच्या मनात नागरी सेवांद्वारे समाजासाठी काहीतरी करण्याची ओढ होती. याच इच्छेपायी तिने नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला, ज्यावर सुरुवातीला अनेकांनी शंका उपस्थित केली होती.
अपयशाने खचली नाही, चिकाटी सोडली नाही
प्रियाचा हा प्रवास सोपा नव्हता. पहिल्या प्रयत्नात तिला अपयश आले. दुसऱ्या प्रयत्नात तिची निवड भारतीय संरक्षण सेवेत झाली. सरकारी नोकरी हातात असतानाही तिचे ध्येय ‘आयएएस’ हेच होते. तिसऱ्या प्रयत्नातही अपेक्षित यश न मिळाल्याने तिने स्वतःला अधिक झोकून दिले. दररोज पहाटे ४ वाजता उठून शिस्तबद्ध अभ्यास आणि सातत्य या जोरावर तिने चौथ्या प्रयत्नात थेट ६९वी रँक पटकावली.
मुलाखतीतील ‘तो’ हजरजबाबीपणा
यूपीएससीच्या मुलाखतीत प्रियाला १९३ गुण मिळाले. मुलाखतीच्या शेवटी जेव्हा पॅनेलने तिला विचारले, “आम्ही तुम्हाला असा कोणता प्रश्न विचारला नाही जो तुम्ही विचारू इच्छिता?” तेव्हा प्रियाने हसत उत्तर दिले, “कदाचित तुम्ही मला माझी ओळख विचारू इच्छिता.” तिच्या या हजरजबाबी आणि समजूतदार उत्तराने मुलाखत घेणारे अधिकारीही प्रभावित झाले.

यशाचा मंत्र: जमिनीशी जोडून राहा
प्रिया आपल्या यशाचे श्रेय चिकाटी आणि शिस्तीला देते. “शिक्षण ही सर्वात मोठी संपत्ती आहे,” असे ती मानते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी नेहमी प्रेरित राहावे आणि आपली मुळे विसरू नयेत, असा सल्लाही तिने दिला आहे. प्रियाच्या या यशामुळे केवळ बिहारमध्येच नव्हे, तर संपूर्ण देशातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ती एक प्रेरणास्थान ठरली आहे.
