कानपूरमधील प्रसिद्ध औषध व्यावसायिक विनीत मिनोचा यांच्या हत्येच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ५ सप्टेंबरच्या रात्री कानपूर या ठिकाणी त्यांच्या राहत्या घरी त्यांची हत्या झाली. विनीत मिनोचा यांच्या शरीरावर २६ हून अधिक चाकूचे वार करण्यात आले आहेत अशीही माहिती आहे. सुरुवातीला हा प्रकार वेगळ्या स्वरूपाचा असल्याचा संशय पोलिसांना होता. मात्र पोलिसांना तपासात कौटुंबिक वाद, आर्थिक नियंत्रण आणि सीसीटीव्हीची देखरेख हे सगळं असल्याचं समोर आलं आहे. एवढंच नाही तर त्यांच्या सुनेनेच त्यांची हत्या घडवून आणली अशीही बाब समोर आली आहे.

पोलिसांनी हत्या प्रकरणात सुनेवर ठेवला ठपका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शालु या सुनेने तिच्या घरातल्या नोकराच्या मदतीने विनीत मनोचा यांची हत्या घडवून आणली. शालूचं म्हणणं होतं की तिचे सासरे विनीत मिनोचा प्रत्येक खर्चाचा हिशोब मागायचे आणि मुला-सुनेच्या खर्चावर त्यांचं अगदी काटेकोर नियंत्रण ठेवून त्यांना अगदी मोजकेच पैसे देत होते. मिळालेल्या माहितीनुसार, पैसे अपुरे पडत असल्याच्या नाराजीतून सून शालूने हा कट रचला होता. विनीत मिनोचा यांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक, आजूबाजूच्या परिसरातील लोक जेव्हा घरी आले, त्यावेळी शालू मिनोचा त्यांच्यासमोर ढसाढसा रडत नाटक करत होती. घरात होणाऱ्या या सततच्या हस्तक्षेपाला ती कंटाळली होती आणि तिला प्रायव्हसी मिळत नव्हती असं पोलिसांनी सांगितलं.

सासऱ्यांचा खासगी आयुष्यातला हस्तक्षेप शालुला पटत नव्हता

सून शालू घरामध्ये कमी पैसे मिळत असल्यामुळे नाराज होती, तसंच विनीत मनोचा यांनी घरात सीसीटीव्ही लावले होते आणि प्रत्येक हालचालीवर ते नजर ठेवत होते. प्रायव्हसी भंग होत असल्यामुळे तसंच खर्चाला कमी पैसे मिळत असल्यामुळे शालू त्रासलेली होती. कोट्यवधींची मालमत्ता असूनही सासरे मुलगा आणि सुनेला घरातल्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच पगार द्यायचे. तसंच त्यांच्यावर पार्टीला जायचीही परवानगी मिळायची नाही, यातूनच विनीत मिनोचा यांच्या हत्येचा कट रचल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तसंच सासरे खासगी आयुष्यात सतत हस्तक्षेप करत होते म्हणूनही सून शालू नाराज होती, त्यामुळे तिने सासऱ्याचा काटा काढण्याचे ठरवले. ५ सप्टेंबरच्या रात्री नोकरांच्या मदतीने तिने विनीत मनोचा यांची हत्या घडवून आणली असा आरोप आहे.

विनीत मनोचा यांच्या हत्येत मुलांचाही सहभाग असल्याचा संशय

विनीत मिनोचा यांची हत्या घडवून आणण्यात फक्त शालूच नाही तर त्यांच्या मुलाचाही सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांना या तिघांच्याही मोबाईल रेकॉर्ड्समध्ये याचे पुरावे सापडल्याचं त्यांनी म्हटलं आहे. २९ ऑगस्ट ते हत्येची रात्र या कालावधीत विशाल आणि सुब्रत यांच्यात २५ वेळा, तर विशाल आणि शालू यांच्यात १४ वेळा संभाषण झाल्याचे रेकॉर्डवरून दिसून आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. हत्या घडत असतानाही शालू विशालच्या संपर्कात होती; या काळात त्यांच्यात व्हॉट्सॲपद्वारे तीन वेळा बोलणे झाले. या संपूर्ण प्रकरणात सुब्रतच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेलं आहे. वडिलांची हत्या होऊनही आणि त्यात पत्नीचा सहभाग असूनही, त्याने पोलिसांसमोर काहीही कबूल केले नाही असंही सांगितलं आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.