नवी दिल्ली : भारतीयांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता आणि त्यासाठी करावयाचे उपाय यामध्ये बरीच तफावत आढळत असल्याचे ‘हाबिल्ड’ या स्वास्थ्यविषयक प्लॅटफॉर्मने केलेल्या सर्वेक्षणात आढळले आहे. या संस्थेने शहरी भागांमध्ये केलेल्या पाहणीनुसार, ४२.५ टक्के भारतीयांनी कामात व्यग्र असताना आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे मान्य केले.

याबरोबरच ५७.८ टक्के भारतीयांनी आपल्या आरोग्यासाठी काय चांगले याची कल्पना असते, पण त्याचा पाठपुरावा करणे जमत नाही, असे मान्य केले. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने हाफिल्डने मंगळवारी हा अहवाल प्रसिद्ध केला. त्यासाठी महानगरे आणि लहान-मोठ्या शहरांमधील पाच हजारांपेक्षा जास्त जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांमध्ये ४५ आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या जवळपास ९० टक्के महिलांचा समावेश होता. त्यापैकी ४६ टक्के प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की ते तंदुरुस्त राहण्याचा सक्रियपणे प्रयत्न करतात पण त्यांना सातत्य राखता येत नाही. २८ टक्के प्रतिसादकर्त्यांनी कुटुंबाच्या जबाबदाऱ्या हा सर्वात मोठा अडथळा असल्याचे सांगितले. त्यापाठोपाठ १९.६ टक्के जणांनी कामाशी संबंधित ताण आणि १७.५ टक्के लोकांनी प्रेरणेचा अभाव हे कारण असल्याचे नमूद केले.

Award Banner

या पाहणीवरून जागरूकतेचा अभाव हे आता आव्हान नाही, तर दैनंदिन जीवनात निरोगी सवयी लावून घेणे हे आव्हानात्मक आहे, असे या अहवावात नमूद करण्यात आले आहे.

निरोगी सवयींसमोरील अडथळे दररोज व्यायाम टाळणे, घरातील जबाबदाऱ्यांमुळे चालायला जाण्यास विलंब करणे किंवा झोपेत तडजोड करणे यामुळे आरोग्याला प्राधान्यक्षेत्रात खालचे स्थान दिले जाते. सातत्यामधील अडथळ्यांत स्त्री-पुरुष भेदही दिसून येतो. महिला कुटुंब आणि घराच्या जबाबदाऱ्यांना अधिक प्राधान्य देतात त्यामुळे त्यांची दिनचर्या अनियमित राहते. तर पुरुषांमध्ये कितीही इच्छा असली तरी त्यांच्यात शिस्त आणि पाठपुरावा ठेवण्यात सातत्य नसते, असे या पाहणीत दिसले.