जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराच्या जवानांनी उधळून लावला आहे. घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या तीन जणांना भारतीय लष्कराच्या जवानांनी अटक करत मोठी कारवाई केली आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कराच्या जवानांनी ही कारवाई केली आहे.
भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने एक्सवर (ट्विटर) दिलेल्या माहितीनुसार, “एका विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे उरी परिसरात ही कारवाई सुरू करण्यात आली होती. या कारवाईचा भाग म्हणून शोध मोहीम सुरू असतानाच सतर्क जवानांनी दोन जणांना ताब्यात घेतलं. ते कथितरित्या या भागातून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. या कारवाईच्या दरम्यान त्यांच्या स्थानिक एका मार्गदर्शकालाही अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे”, अशी माहिती चिनार कॉर्प्सने दिली आहे.
लष्कराने अटक केलेल्या तीन व्यक्तींपैकी एकाची ओळख पाकिस्तान व्याप्त काश्मीर येथील ‘घुसखोर’ म्हणून पटली आहे. दरम्यान, लष्कराने सांगितलं की, आता पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
भारतीय लष्कराने एक्सवरील दुसऱ्या एका पोस्टमध्ये म्हटलं की, “पाकव्याप्त काश्मीरमधील घुसखोराला अटक करण्यात आली आहे. उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषा ओलांडताना सतर्क चिनार कॉर्प्सच्या जवानांनी एका पाकव्याप्त काश्मीरमधील घुसखोराला पकडलं आहे. दक्ष जवानांनी घुसखोराला आव्हान देताना संयम राखला आणि अत्यंत कुशलतेनं त्याला ताब्यात घेतलं आहे. आता पुढील कायदेशीर कारवाईसाठी घुसखोराला जम्मू-काश्मीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.”
