Uri Grenade Blast Maharashtra Jawans Deaths Update: उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ एक दुर्दैवी घटना घडली आहे. लष्कराच्या कॅम्पमध्ये झालेल्या ग्रेनेड स्फोटात भारतीय लष्कराच्या दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. हे दोन्ही शहीद जवान महाराष्ट्राचे सुपुत्र असल्याची माहिती समोर आली असून, या घटनेमुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.
लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी उरी सेक्टरमधील ‘कमलकोट’ लष्करी कॅम्पमध्ये नेहमीप्रमाणे शस्त्रास्त्रांची आणि साहित्याची देवाणघेवाण सुरू होती. याच दरम्यान एका हँड ग्रेनेडचा (हातबॉम्ब) अचानक स्फोट झाला, या भीषण स्फोटात दोन जवान गंभीर जखमी झाले होते.
तातडीने उपचार, पण यश आले नाही
स्फोट झाल्यानंतर जखमी जवानांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्यांची गंभीर प्रकृती पाहता त्यांना तातडीने श्रीनगर येथील लष्कराच्या ‘९२ बेस हॉस्पिटल’मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, परंतु उपचारादरम्यान दोन्ही जवानांची प्राणज्योत मालवली.
लष्कराकडून चौकशीचे आदेश
या दुर्दैवी घटनेनंतर लष्कराने सर्व आवश्यक कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे. हा स्फोट नेमका कसा झाला, याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार हा केवळ एक अपघात असल्याचे दिसते आहे. श्रीनगरमधील संरक्षण विभागाच्या जनसंपर्क कार्यालयाने सांगितले की, संबंधित अधिकाऱ्यांकडून पडताळणी झाल्यानंतर या घटनेबाबत सविस्तर अधिकृत पत्रक जारी केले जाईल.
नियंत्रण रेषा ओलांडणारा १४ वर्षांचा पाकिस्तानी मुलगा ताब्यात
जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर दुसरी एक घटना समोर आली आहे. पुंछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टरमध्ये एका १४ वर्षांच्या पाकिस्तानी मुलाला सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतले आहे. हा मुलगा चुकून भारतीय हद्दीत दाखल झाला होता.
नेमके काय घडले?
पाकव्याप्त काश्मीरमधून (PoK) नियंत्रण रेषा ओलांडून हा अल्पवयीन मुलगा मेंढर सेक्टरमधील ‘नागरी टेकरी’ भागात आला होता. तिथे तैनात असलेल्या सतर्क भारतीय जवानांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले. प्राथमिक तपासानुसार, हा मुलगा जाणीवपूर्वक न येता रस्ता भरकटल्यामुळे चुकून भारतीय हद्दीत आल्याचा अंदाज आहे. सध्या प्रस्थापित नियमांनुसार सुरक्षा यंत्रणांकडून त्याची चौकशी केली जात असून, सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला पुन्हा पाकिस्तानात सुपूर्द केले जाण्याची शक्यता आहे.
