अमेरिकेतील एच१बी व्हिसा घोटाळय़ात भारतीय वंशाच्या चार अमेरिकी लोकांवर आरोपपत्र ठेवण्यात आले असून, त्यात एका दाम्पत्याचा समावेश आहे. त्यांच्यावर गैरमार्गाने एच १बी व्हिसा मिळवून दिल्याचा आरोप संघराज्य अभियोक्त्यांनी ठेवला आहे.

सुनीता गुंटीपल्ली व व्यंकट गुंटीपल्ली या दाम्पत्यासह प्रताप बॉब कोंडामुरी व संध्या रामीरेड्डी यांच्यावर एकूण ३३ आरोप असून, त्यात एच १ बी व्हिसा गैरमार्गाने मिळवून देण्याच्या मुख्य आरोपाचा समावेश आहे. एच १ बी व्हिसा हा अमेरिकेत राहून नोकरी करण्यासाठी दिला जातो. आरोपपत्रानुसार चार आरोपींनी कॅलिफोर्नियातील तीन कंपन्यांचा उपयोग करून घेऊन खोटी कागदपत्रे एकूण १०० एच १ बी व्हिसा अर्जामध्ये सादर केली. उत्तर कॅलिफोर्नियाच्या अमेरिकी वकिलांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की व्यंकट व सुनीता यांनी सिलिकॉन व्हॅलीत डीएस सॉफ्ट टेक व इक्विनेट या कंपन्या स्थापन केल्या. या रोजगारासाठी लोकांची भरती करणाऱ्या कंपन्या आहेत. त्यात व्यंकट हे अध्यक्ष तर सुनीता या उपाध्यक्ष आहेत. कोंडामुरी हे नेवादाचे असून ते एसआयएसएल नेटवर्कचे संस्थापक आाहेत, तर त्यांची बहीण रामीरेड्डी या प्लिसॅन्टनच्या संस्थापक आहेत. या दोघांनी तीन कंपन्यांचे मनुष्यबळ व्यवस्थापक म्हणून काम केले. या चौघांवर गुन्हेगारी कट करून व्हिसा घोटाळा करणे, चुकीचे निवेदने व कागदपत्रे सादर करणे, मेल्समध्ये घोटाळे, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न असे आरोप आहेत. त्यांनी सरकारला एच १ बी व्हिसा अर्जाबरोबर जी कागदपत्रे दिली ती बनावट व चुकीची होती. परदेशी कामगारांना अमेरिकेत वास्तव्यासाठी एच १बी व्हिसा मिळवून देण्यासाठी त्यांनी गैरमार्गाचा वापर केला. आरोपपत्रातील माहितीनुसार ज्या कंपन्यांमध्ये परदेशी कर्मचारी भरती केले जाणार होते, त्या कंपन्याच अस्तित्वात नाहीत. २०१० ते २०१४ दरम्यान त्यांनी शेकडो व्हिसा अर्ज दाखल केले होते. व्हॅलीत डीएस सॉफ्ट टेक व इक्विनेट या कंपन्यांचे मालक असलेल्या गुंटीपल्ली यांनी या काळात ३३ लाख डॉलर्सचा निव्वळ तर १.७० कोटी डॉलर्सचा एकूण नफा मिळवला.