scorecardresearch

रशिया-युक्रेन युद्ध अटळ? अमेरिकेने नागरिकांना दिला सल्ला; सांगितलं, “रशियात जाऊ नका, गेल्यास…”

अमेरिकेने आपल्या नागरिकांना रशियात न जाण्यासंबंधी सल्ला दिला आहे

Russia Ukraine, US, US advises citizens, Russia Travel,
अमेरिकेने आपल्या नागरिकांना रशियात न जाण्यासंबंधी सल्ला दिला आहे

रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष होण्याची शक्यता बळावली आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्या नागरिकांना रशियात न जाण्यासंबंधी सल्ला दिला आहे. रशियाने युक्रेनलगत सीमेवर एक लाखाहून अधिक सैन्य जमा केलं आहे. यामुळे रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष अटळ असल्याचं बोललं जात आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेवर एक लाखाहून अधिक खडे सैन्य जमवल्यामुळे क्रिमियाप्रमाणेच युक्रेनच्या आणखी एखाद्या भूभागावर कब्जा करण्याचा रशियाचा इरादा असावा, अशीही चर्चा सुरू आहे.

दरम्यान अमेरिकेने आपल्या नागरिकांना इशारा देत सांगितलं आहे की, “युक्रेनसोबत सुरु असल्याने तणावामुळे सध्या रशियाला प्रवास करु नका”. यावेळी अमेरिकेने तिथे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागू शकतो आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणं दुतावासासाठी फार अवघड असेल असंही स्पष्ट केलं आहे.

विश्लेषण : अमेरिका-रशिया संघर्ष भडकेल ?

युक्रेनच्या राजधानीत असणाऱ्या अमेरिकन राजदूतांच्या कुटुंबांना तात्काळ देश सोडण्यास सांगण्यात आलं आहे. रशियाकडून घुसखोरी करण्याची भीती असल्याने हा आदेश देण्यात आला आहे.

रशियाने फक्त सैन्य नाही तर टँक, लढाऊ वाहनं, तोफखाना आणि क्षेपणास्त्रंही सीमेवर तैनात केली आहेत. रशियाने माघार घ्यावी यासाठी वारंवार त्यांचं मन वळवण्यासाठी राजनैतिक प्रयत्न केले जात आहेत, मात्र त्याचा फायदा झालेला नाही.

युक्रेनबाबतच्या भारतातील वक्तव्यामुळे जर्मन नौदलप्रमुखांचा राजीनामा

रशियाकडून आक्रमणाविषयी एकीकडे वारंवार इन्कार केला जातो. मात्र राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भाषाही फार सबुरीची नाही. या मुद्द्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि पुतीन यांच्यात अनेकदा चर्चा झाली, ज्यातून ठोस फलनिष्पत्ती अशी काही झाली नाही. बायडेन यांच्या मते युक्रेनवर रशिया आक्रमण करणार नाही, पण एखाद्या भागात मुसंडी मारू शकतो.

रशिया आक्रमक कशासाठी?

उत्तर अटलांटिक करार संघटना अर्थात ‘नाटो’मध्ये युक्रेनच्या संभाव्य समावेशावरून रशिया आक्रमक बनलेली आहे. युक्रेन नाटोमध्ये सहभागी झाल्यास या संघटनेची व्याप्ती थेट रशियाच्या सीमेपर्यंत येऊन पोहोचते. यापूर्वी पोलंड, लिथुआनिया, एस्टोनिया आणि लॅटव्हिया या देशांना नाटोमध्ये सहभागी करून विशेषत: अमेरिकेने रशियावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला, अशी रशियाच्या नेत्यांची आणि विशेषत: पुतिन यांची भावना आहे.

रशियन फौजा नेमक्या कुठे आहेत?

सध्या येल्न्या, क्लिमोवो, क्लिन्त्सी, पोेगोनोवो, सोलोटी या सीमावर्ती भागांमध्ये रशियाचे सैन्य आणि सामग्री मोठ्या प्रमाणावर तैनात आहे. पूर्वी युक्रेनचा भाग असलेल्या पण सध्या रशियाने कब्जा केलेल्या क्रिमियामध्ये रशियन फौजा गेली आठ वर्षे दाखल झालेल्या आहेतच. याशिवाय युक्रेनच्या आग्नेयेकडील डॉनेत्स्क आणि लुहान्स्क प्रांतांच्या मोठ्या भूभागावर रशियन बंडखोरांचा कब्जा आहे. रशियाच्या आणखी काही फौजा लष्करी कवायती आणि सरावासाठी बेलारूसमध्ये दाखल होत आहेत. युक्रेनच्या उत्तरेकडे असलेला हा देश रशियाधार्जिणा म्हणून ओळखला जातो. फेब्रुवारीमध्ये तेथूनही युक्रेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न रशियाकडून होऊ शकतो, असा सामरिक विश्लेषकांचा होरा आहे.

नाटोच्या विस्ताराबद्दल रशिया इतकी संवेदनशील का?

नाटो ही लष्करी सहकार्य संघटना आहे. या संघटनेत सहभागी झालेल्या कोणत्याही एका सदस्य देशावरील आक्रमण हे संपूर्ण संघटनेवरील आक्रमण मानून त्याला प्रतिसाद दिला जातो. १९९७नंतर पूर्व युरोपातील १४ देश या संघटनेत सहभागी झाले. या देशांना अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी अशा मोठ्या पाश्चिमात्य सत्तांकडून शस्त्रसामग्रीचा पुरवठा होतोच, शिवाय नाटोच्या फौजाही आणि क्षेपणास्त्रेही या देशांमध्ये तैनात आहेत. या १४ देशांपैकी पोलंड, लिथुआनिया, एस्टोनिया आणि लॅटव्हिया यांचे नाटोमध्ये जाणे रशियाच्या जिव्हारी लागले. लिथुआनिया, एस्टोनिया आणि लॅटव्हिया हे देश पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत महासंघात समाविष्ट होते. तर पोलंडविषयी रशियन नेतृत्व नेहमीच संवेदनशील राहिलेले आहे. नाटोचा रेटा आणखी वाढल्यास, आम्ही पूर्वेकडे किती सरकायचे असा रशियाचा सवाल आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Us advises citizens against travel to russia amid tensions on ukraine border sgy

ताज्या बातम्या