scorecardresearch

चीनच्या निशाण्यावर कॅनडा? एअरस्पेसमध्ये उडताना दिसली कारसदृष्य वस्तू, पंतप्रधानांच्या फोननंतर अमेरिकेने…

अमेरिकेच्या हवाई हद्दीत घुसखोरी करून कथित गुप्त माहिती गोळा करणारा चीनचा स्पाय बलून अमेरिकेने पाडला होता. आता अशीच एक घटना कॅनडामध्ये घडली आहे.

Canada pm Justin Trudeau
कॅनडाच्या हवाई हद्दीत एक कारसदृष्य वस्तू उडताना दिसली होती. (PC : The Indian Express)

अमेरिकेने शनिवारी कॅनडाच्या हवाई हद्दीत उडणाऱ्या एक अनोळखी वस्तू हल्ला करून पाडली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली आहे. अमेरिकेच्या हवाई हद्दीत हेरगिरी करणारे स्पाय बलून उडवल्याच्या घटनेनंतर अमेरिकेतील बायडेन सरकार सतर्क झालं आहे.

ट्रुडो यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे की, अमेरिकन एफ-२२ लढाऊ विमानाने युकोन भागात उडणारी कारसदृष्य वस्तू पाडली आहे. कॅनडाचे जवान मलब्याखाली दबलेली ही वस्तू बाहेर काढून त्यावर संशोधन करतील. ट्रुडो म्हणाले की, त्यांनी जो बायडेन यांना कॅनडाच्या हवाई क्षेत्रात उडणाऱ्या एका अज्ञात वस्तूबद्दल माहिती दिली होती. एका दिवसानंतर, अमेरिकेने अलास्काजवळ असताना ही उडती उस्तू खाली पाडण्याचे आदेश दिले. परंतु अमेरिकन लष्कराने याबाबत काहीही माहिती दिलेली नाही.

चीन-अमेरिकेत तणाव?

वायव्य कॅनडामध्ये एक अज्ञात फ्लाईंग ऑब्जेक्ट पाडण्याच्या एक दिवस आधी अमेरीकन अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, त्यांनी अलास्काच्या ४०,००० फूट वर उडणारी एक वस्तू पाडली आहे. तसेच याच्या एक आठवडा आधी अमेरिकन सैन्याने ४ फेब्रुवारी रोजी कथित चिनी हेरगिरी करणारा बलून पाडला होता. यामुळे चीन आणि अमेरिकेत सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

हे ही वाचा >> Turkey Earthquake: १४ दिवसांनी भारतात परतणार होता; दुर्दैवाने भूकंपाने हिरावलं विजयचं आयुष्य

तो सिव्हिल बलून होता : चीनचं स्पष्टीकरण

अमेरिकेच्या न्युक्लियर साईटवर हेरगिरी करणारा चिनी बलून पाहायला मिळाला होता. हा बलून अमेरिकेच्या हवाई दलाने ४ फेब्रुवारी रोजी पाडला. अमेरिकेने चीनवर गुप्त माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. परंतु चीनने म्हटलं आहे की, “हा एक सिव्हील बलून होता. केवळ हवामानासंबंधीची माहिती गोळा करण्यासाठी हा बलून हवेत सोडण्यात आला होता.”

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-02-2023 at 12:59 IST
ताज्या बातम्या