US Iran Air Strike Strait of Hormuz Tension Updates: पश्चिम आशियातील तणाव शिगेला पोहोचला असून अमेरिकेने इराणविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. अमेरिकन लष्कराने इराणवर या आठवड्यात दुसरा मोठा ‘बचावात्मक’ हवाई हल्ला केला आहे. इराणचे चार ड्रोन पाडण्यात आले असून, पाचवे ड्रोन डागण्याच्या तयारीत असलेल्या एका तळाला अमेरिकेने लक्ष्य केले. यादरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘होर्मुझच्या सामुद्रधुनीवर (Strait of Hormuz) कोणाचीही हुकूमशाही चालणार नाही,’ असा कडक इशारा दिला आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ मोठी लष्करी कारवाई

अमेरिकन लष्कराच्या या गुप्त आणि संवेदनशील कारवाईची माहिती दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘द असोसिएटेड प्रेस’ (AP) या वृत्तसंस्थेला दिली आहे. इराणच्या हालचालींमुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीला मोठा धोका निर्माण झाला होता. इराणकडून आक्रमक कारवाया सुरू असल्याचे स्पष्ट होताच, अमेरिकेने सुरक्षेचा उपाय म्हणून हा हल्ला केला. इराणचे पाचवे ड्रोन हवेत झेप घेण्यापूर्वीच अमेरिकेने त्यांचा तळ उद्ध्वस्त केला.

ट्रम्प यांनी वृत्त फेटाळले, ओमानलाही दिला इशारा

इराणमधील सरकारी टीव्हीने दावा केला होता की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी व्यापारी जहाजांची वाहतूक युद्धपूर्व पातळीवर आणण्यासाठी एक अनधिकृत कराराचा मसुदा तयार झाला आहे. यानुसार इराण आणि ओमान संयुक्तपणे या वाहतुकीचे नियंत्रण करणार आहेत. मात्र, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅबिनेट बैठकीत इराणचा हा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ट्रम्प म्हणाले की, या आंतरराष्ट्रीय जलमार्गावर कोणत्याही एका देशाचे नियंत्रण असू शकत नाही.

डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले?

“होर्मुझच्या समुद्रधुनीवर कोणीही नियंत्रण मिळवू शकत नाही. हे आंतरराष्ट्रीय जलक्षेत्र आहे. ओमानलाही इतर देशांप्रमाणेच नियमांचे पालन करावे लागेल, अन्यथा आम्हाला त्यांच्यावरही कारवाई करावी लागेल. मला खात्री आहे की त्यांना ही भाषा समजेल आणि ते सहकार्य करतील.” असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

ओमानसोबतच्या संबंधांमध्ये तणाव येण्याची शक्यता?

अमेरिकेचे ओमानसोबत गेल्या अनेक दशकांपासून मजबूत आर्थिक आणि लष्करी संबंध आहेत. असे असतानाही ट्रम्प यांनी ओमानचा उल्लेख करत थेट इशारा दिल्याने जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी हा जागतिक खनिज तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो. या मार्गावर इराणचा प्रभाव कमी करण्यासाठी अमेरिका सध्या लष्करी ताकदीचा वापर करत असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट होत आहे.