US Airstrike Wedding Iran Child Killed : अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीच्या किनारपट्टीवर असलेल्या सिरिकजवळ हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात ४ वर्षांच्या चिमुरड्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती इराणच्या अधिकाऱ्यांनी दिली. तर, या हल्ल्यात ५० जण जखमी झाल्याचंही वृत्त आहे. हा हल्ला एका लग्न सोहळ्यात झाला.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, “या क्रूरतेला यापूर्वी झालेल्या अत्याचारांच्या मालिकेपासून वेगळं पाहता येणार नाही.” त्यांनी चालू युद्धाच्या पहिल्याच दिवशी मिनाब येथील मुलींच्या शाळेवर झालेल्या हवाई हल्ल्याचा दाखला दिला, ज्यामध्ये १६० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. पेंटागॉनने अद्याप मिनाब हल्ल्याबाबत कोणताही अधिकृत निष्कर्ष जारी केलेला नाही, परंतु ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अमेरिकेने जुनाट लक्ष्यीकरण डेटा वापरल्यामुळे हा हल्ला झाला असावा.

गेल्या काही आठवड्यांपासून इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध पेटले आहे. असं असतानाच लग्न समारंभावर हल्ला झाला आहे. यात वॉशिंग्टनने आणखी विनाशकारी हल्ले करण्याची धमकी दिली आहे. भारतातील इराणी दूतावासाने या नागरिक मृत्यूबद्दल तीव्र संताप व्यक्त करत, याला “दहशतवादी अमेरिकन लष्कराचे आणखी एक गुन्हेगारी कृत्य” म्हटलं आहे. या राजनैतिक दूतावासाने ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले, “दक्षिण इराणमधील बंदर कुहेस्तक येथील लग्नाच्या समारंभावर अमेरिकन लष्कराने केलेल्या हल्ल्यात किमान ५ लोकांचा मृत्यू झाला असून ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत.”

अमेरिकेच्या लष्कराकडून आयआरजीसीच्या ठिकाणांना लक्ष्य केल्याचा दावा

अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांडने सांगितलं की, त्यांनी मंगळवारी इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या ठिकाणांवर हल्ल्यांची एक मोठी मालिका पूर्ण केली. यामध्ये हवाई संरक्षण यंत्रणा, रडार यंत्रणा, सागरी मालमत्ता आणि सुविधा, सुरुंग पेरण्याची क्षमता आणि दळणवळण केंद्रांचा समावेश होता. इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार, मंगळवारी देशभरातील अनेक ठिकाणांवर हल्ले झाले, त्यापैकी बहुतांश हल्ले संघर्षग्रस्त होर्मुझ सामुद्रधुनीजवळ झाले. या मोक्याच्या जलमार्गावरून परवानगीशिवाय जाणाऱ्या तेलवाहू जहाजांना इराणने धमकी दिली होती.

दुसरीकडे, तेहरानने अधिकृत निवेदनात दावा केला आहे की त्यांनी जॉर्डन आणि इराकमधील अमेरिकन मालमत्तांवर हल्ले केले, तर इराणी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार त्यांनी बहरीनवरही हल्ला केला. जरी आयआरजीसीने जॉर्डनमध्ये मोठ्या संख्येने अमेरिकन सैनिकांना मारल्याचा दावा केला असला, तरी दोन अमेरिकन अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला सांगितलं की, प्राथमिक मूल्यांकनानुसार कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

जॉर्डनच्या सशस्त्र दलांनी सांगितलं की त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेने देशाच्या हवाई हद्दीत प्रवेश केलेल्या १३ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मुकाबला केला, ज्यापैकी १० क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्यात आली आणि ३ दुर्गम भागात पडली. बहरीनने सांगितलं की त्यांनी इराणी ड्रोनचा माग काढून ते नष्ट केलं.