Middle East Crisis : अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा एकदा भडकला आहे. दोन्ही देशातील वाढत्या संघर्षामुळे आता मध्य पूर्वेत पुन्हा युद्धाचे ढग गडद झाले आहेत. २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या युद्धाला काही दिवसांपूर्वी पूर्णविराम मिळाला होता. डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी शांतता करारावर स्वाक्षऱ्याही केल्या होत्या. मात्र, त्यानंतर अचानक ही शस्त्रसंधी संपुष्टात आल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आणि अमेरिका-इराणमधील संघर्षात पुन्हा वाढ झाली.
इराणने दोन दिवसांपूर्वी जॉर्डनमधील अमेरिकेच्या तळावर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. या हल्ल्यात अमेरिकेच्या हवाई तळाचं मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी अमेरिकेने इराणवर पुन्हा भीषण हवाई हल्ले केले आहेत. इराणच्या दक्षिण भागात अनेक ठिकाणी हे हल्ले करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
अमेरिकेने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्याची माहिती यूएस सेंट्रल कमांडकडून एक्सवर पोस्ट शेअर करत देण्यात आली आहे. इराणवरील लष्करी कारवायांना काही दिवस स्थगिती दिल्यानंतर अमेरिकेने गुरुवारी पुन्हा एकदा इराणमधील काही भागांवर हवाई हल्ले करत लक्ष्य केलं आहे. इराणने अमेरिकी सैन्यावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्याचा आरोप वॉशिंग्टनकडून करण्यात आला होता. त्यामुळे खवळलेल्या अमेरिकेने इराणच्या दक्षिण भागात अनेक ठिकाणी हवाई हल्ले केल्याचं बोललं जात आहे.
यूएस सेंट्रल कमांडने काय म्हटलं?
“अमेरिकी सैन्याने आज रात्री ८ वाजता इराणविरुद्ध हल्ले करण्यास सुरुवात केलेली आहे. मध्यपूर्वेत तैनात असलेल्या अमेरिकी सैन्यावर इराणने काल केलेल्या हल्ल्याच्या प्रयत्नांनानंतर हे हल्ले जोरदार प्रत्युत्तर म्हणून करण्यात येत आहेत”, अशी माहिती यूएस सेंट्रल कमांडने एक्सवरील पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.
इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार, इराणच्या दक्षिणेकडील भागात अनेक ठिकाणी स्फोट झाल्याचं वृत्त आहे. तसेच होर्मुझच्या सामुद्रधुनीतील एका बेटावर तीन स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. बेटावरील एका निवासी भागावरही क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचा दावा इराणकडून करण्यात येत आहे. इराणी माध्यमांनी बुशेहर आणि दक्षिणेकडील इतर अनेक ठिकाणी स्फोट झाल्याचा दावा केला आहे. या हवाई हल्ल्यात जीवितहानी किंवा किती नुकसान झालं? याची अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळाली नाही.
अमेरिका-सौदीचे इराकवर हल्ले; इराणशी संलग्न २० बंडखोर ठार
अमेरिका आणि सौदी अरेबियाने बुधवारी इराकमधील इराणशी संलग्न बंडखोरांवर हल्ले केले. या हल्ल्यात २० जणांचा मृत्यू झाला. इराणनेही जॉर्डनमधील अमेरिकेच्या तळांवर आणि होर्मुझ सामुद्रधुनीमधून जाणाऱ्या नौकांवर हल्ले केले. या नव्या संघर्षामुळे तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या. ‘आम्ही त्यांच्यावर जोरदार हल्ले करू,’ अशी धमकी देतानाच ‘आम्ही त्यांना चर्चाही करू देऊ,’ असं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं. दरम्यान, अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या हल्ल्याचा इराकने निषेध केला असून, इराकच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केल्याचा आरोप इराकच्या अध्यक्षांनी केला.
