US Treasury Secretary Scott Bessent on India Russia oil deal: पश्चिम आशियातील आखाती प्रदेशात युद्धाची परिस्थिती उद्भवल्यामुळे जगावर तेल आणि गॅसच्या कमतरतेचे आव्हान निर्माण झाले आहे. भारतालाही याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली गेली. तेल आणि गॅस वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग असलेल्या होर्मुझची सामुद्रधुनीवर इराणने निर्बंध आणल्यास जागतिक ऊर्जा संकट उभे राहण्याची भीती आहे. अशातच भारताने रशियाकडून तेल आयात करावे, यासाठी अमेरिकेने ३० दिवसांची सूट दिल्याची बातमी समोर आली. यावर आता विरोधक टीका करत आहेत.
अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत भारताने रशियाकडून तेल आयात करावे, यासाठी अमेरिका ३० दिवसांची सूट देत आहे, असे विधान केले. ही तात्पुरती सूट असून सध्या समुद्रात उभ्या असलेल्या जहाजांना लागू होणार असल्याचेही बेसेंट म्हणाले.
गुलामांना परवानगी दिली जाते
शिवसेनेचे (ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी या प्रकारावरून केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. “रशियाकडून तेल घेण्यास अमेरिका आपल्याला परवानगी देत आहे. अमेरिका भारताला नाचवत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे कठपुतली झाले आहेत. अमेरिकेच्या सचिवांनी एक्सवर जी पोस्ट केली ती खेदजनक आहे. अशी परवानगी गुलाम राष्ट्रांना दिली जाते”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
काँग्रेसचीही टीका
काँग्रेसचे आमदार सत्यजित तांबे यांनीही या प्रकारावर सडकून टीका केली. “आज रशियाकडून तेल म्हणजेच क्रूड ऑईल खरेदी करण्यासाठी परवानगी देताना अमेरिकेने जे शब्द वापरलेत त्याचा मी तीव्र निषेध करतो”, असे तांबे म्हणाले.
“भारत हा एक स्वतंत्र तसेच लोकशाही देश आहे, ही काय अमेरिकेची किंवा इतर कोणत्याही देशाची कॉलनी नाही. ट्रम्प यांच्या काळात जगाला वेठीस धरण्याचे जे काही प्रकार अमेरिका करत आहे, ते फक्त पैसा, सत्ता व सैन्य ताकदीच्या जोरावर. भारताच्या सरकारने आपल्या परराष्ट्र धोरणावर जरा अधिक लक्ष दिले पाहिजे. भारताच्या स्वाभिमानाला धोका निर्माण होऊ देऊ नये”, अशी मागणी तांबे यांनी केली.
आधी ब्रिटिशांची परवागनी आता अमेरिकेची – दमानिया
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकारावर जोरदार टीका केली. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या, “ब्रिटिश गेल्यानंतर आपण स्वतंत्र झालो असे मानतो, पण आताची स्थिती काय? आता अमेरिका ठरवणार भारताने रशियाकडून तेल किती दिवस विकत घ्यायचे? ३० दिवसांची परवानगी म्हणे! वा! म्हणजे आधी ब्रिटिशांची परवानगी घ्यायचो, आता अमेरिकेची? भारत खरंच स्वतंत्र आहे की अजूनही कुणाच्या ‘परवानगी’वर चालतोय?”
