पीटीआय, श्रीनगर
जम्मू-काश्मीरला भेट देण्यासाठी अमेरिकी नागरिकांसाठी जारी केलेल्या सुरक्षेसंदर्भातील अधिसूचनेचा अमेरिका पुन्हा विचार करील, असे प्रतिपादन अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी बुधवारी केले. काश्मीर अधिक सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पावले उचलल्याचे ते म्हणाले.
गोर यांचे श्रीनगर येथे बुधवारी सकाळी आगमन झाले. ते जम्मू-काश्मीर, लडाखच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेने जम्मू-काश्मीरमध्ये प्रवास करण्यासाठी अमेरिकी नागरिकांना खबरदारीच्या सूचना यापूर्वी दिल्या आहेत. त्यावर गोर म्हणाले, ‘अमेरिका प्रवासासंबंधी इशारे वेळोवेळी जारी करते आणि नंतर त्यांचा पुनर्विचारही करते. मी आज फार मोठी घोषणा करणार नाही. पण, या इशाऱ्यांबाबत आम्ही पुनर्विचार नक्की करू, असे आश्वासन देतो.’
दरम्यान, पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनीही अमेरिकेने काश्मीरमध्ये प्रवास करण्यासंंबंधी लागू केलेल्या सूचनेचा फेरविचार करावा, अशी विनंती गोर यांच्याकडे केली.
गोर-अब्दुल्ला यांच्यात चर्चा
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी गोर यांच्याबरोबर भारत-अमेरिका संबंध आणि जम्मू-काश्मीर यांवर चर्चा केली. ते म्हणाले, ‘आमच्यातील चर्चा चांगली झाली. दोन्ही देशांतील संबंधांवर आम्ही एकमेकांशी बोललो. अमेरिका जम्मू-काश्मीरसाठी खास करून आणखी काय करू शकेल, यावर चर्चेचा केंद्रबिंदू होता. जम्मू-काश्मीरसंदर्भात ऐतिहासिक मुद्दे नक्कीच आहेत. पण, अमेरिकेबरोबरील ही चर्चा पुढे घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न करू.’ गोर यांचे आगमन होण्यापूर्वी अब्दुल्ला यांनी गोर यांच्याबरोबर अंतर्गत अंतर्गत स्तरावरील कुठलाही मुद्दा त्यांच्यापुढे उपस्थित करणार नाही, असे सांगितले. तसेच, ‘हे मुद्दे केवळ केंद्र सरकारच सोडवू शकेल,’ असेही ते म्हणाले.
हा प्रदेश सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र सरकार, येथील मुख्यमंत्री, राज्य सरकारने विश्वासार्ह पावले उचलली आहेत. हा प्रदेश खूपच सुंदर आहे. अमेरिकी नागरिकांना येथे यायला खूप आवडेल. त्यामुळे या ठिकाणी प्रवासासंबंधी दिलेला गंभीर इशाऱ्याचा पुनर्विचार अमेरिकेने करायला हवा.- सर्जिओ गोर, अमेरिकेचे भारतातील राजदूत
