भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी शुक्रवारी भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. अमेरिकेबरोबरच्या व्यापार कराराचा एक भाग म्हणून भारताने रशियन तेल खरेदीबाबत वचनबद्धता दर्शवली आहे, ज्यामुळे भारताने ‘एनर्जी सोर्सिंग’मध्ये विविधता आणली आहे, असे गोर म्हणाले आहेत. तसेच, दोन्ही देशांमधील हा अंतरिम व्यापार करारावर लवकरच स्वाक्षरी केली जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात २ फेब्रुवारी रोजी झालेल्या फोन कॉलमध्ये व्यापार कराराबाबत एकवाक्यता झाली होती. त्यानंतर भारताने रशियन ऊर्जा खरेदीबाबत व्यक्त केलेल्या वचनबद्धतेबाबत अमेरिकेच्या संदेश गोर यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.

भारतीयने अद्याप रशियन तेल आयात बंद करण्याबाबतच्या दाव्याला दुजोरा दिलेला नाही, तसेच हा दावा नाकारला देखील नाही. भारत ऊर्जेचे विविध स्त्रोत कायम राखेल आणि सर्व खरेदी ही राष्ट्रीय हिताच्या दृष्टीनेच केली जाईल, इतकेच सांगितले जात आहे.

“तेलाच्या मुद्द्यावर एक करार झाला आहे. दोन नेत्यांमधील ते एक खासगी संभाषण असल्याने मी त्याबद्दल फार खुलासा करू इच्छित नाही…. भारताने त्यांच्या तेलाच्या स्त्रोतांमध्ये विविधता आणली असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे,” असे गोर म्हणाले. एआय इम्पॅक्ट समिटदरम्यान भारत अमेरिकेच्या नेतृत्वाखालील ‘पॅक्स सिलिका’ उपक्रमात सहभागी झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना गोर यांनी हे विधान केले.

“हे फक्त भारताबद्दल नाही. अमेरिकेची इच्छा आहे की कोणीही रशियाकडून खरेदी करू नये. राष्ट्राध्यक्ष याबाबत अत्यंत स्पष्ट राहिले आहेत- त्यांची इच्छा आहे की हे (रशिया-युक्रेन) युद्ध संपावे. त्यामुळे जो कोणी अजूनही कोणत्याही प्रकारे या संघर्षामध्ये सहभागी आहेत, राष्ट्राध्यक्षांची इच्छा आहे की ते थांबले पाहिजे, जेणेकरून त्याबरोबरच शांतता प्रस्थापित होईल,” असे गोर म्हणाले.

करारावर स्वाक्षरी कधी होणार

गोर म्हणाले की, हा करार लवकरच पूर्ण व्हावा यासाठी भारत आणि अमेरिकेचे अधिकारी यांच्यात अंतरिम व्यापार कराराला अंतिम रूप देण्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत.

“स्वाक्षरी (व्यापार करारावर) लवकरच होईल. अगदी या आठवड्यातही होऊ शकेल, दोन्ही देशांची पथके एकमेकांशी चर्चा करत आहेत आणि दोन्ही देशांना स्वाक्षरी करणे शक्य होईल अशा टप्प्यावर पोहोचत आहेत,” असे ते म्हणाले.

भारत वेनेझुएलाकडून तेल खरेदी करण्याची शक्यता असून याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गोर म्हणाले की, ते याबद्दल अधिकची माहिती देऊ इच्छित नाहीत. “यातील काही बाबी अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत, पण सध्या सक्रियपणे वाटाघाटी सुरू आहेत. अमेरिकेचे डिपार्टमेंट ऑफ एनर्जी हे येथील ऊर्जा मंत्रालयाशी चर्चा करत आहे आणि त्यामुळे आम्हाला आशा आहे की याबद्दल लवकरच काही बातमी ऐकायला मिळेल,” असे ते म्हणाले.