भारताला हार्पून क्षेपणास्त्र संच विक्रीस अमेरिकेची मंजुरी

राजकीय स्थिरता, शांतता व आर्थिक प्रगती यांना यातून प्राधान्य मिळेल असे डीएससीए या पेंटॅगॉनच्या संस्थेने म्हटले आहे.

वॉशिंग्टन : भारताला ‘हार्पून जॉइंट कॉमन टेस्ट सेट’म्हणजे जेसीटीएस यंत्रणा  विकण्यास अमेरिकेने मंजुरी दिली आहे. या संचाची किंमत ८.२ कोटी डॉलर्स असून त्यामुळे दोन्ही देशातील द्विपक्षीय सामरिक संबंध सुधारणार असून हिंद प्रशांत क्षेत्रात भारत हा प्रमुख संरक्षण भागीदार ठरणार आहे.

पेंटॅगॉनच्या संरक्षण सुरक्षा सहकार्य संस्थेने  हा संच भारताला देण्यास हिरवा कंदील दिल्यानंतर आता त्याबाबतची अधिसूचना अमेरिकी काँग्रेसमध्ये मंजूर केली जाणार आहे. हार्पून ही जहाज विरोधी क्षेपणास्त्र संच मालिका आहे. भारत सरकारने ‘हार्पून जॉइंट कॉमन टेस्ट सेट’ची मागणी अमेरिकेकडे केली होती. त्यात हार्पून क्षेपणास्त्रच्या सुटय़ा भागांची निगा व दुरुस्ती यासाठी एक केंद्र उभारले जाणार आहे. यात तांत्रिक माहिती व प्रशिक्षण या बाबींचाही समावेश आहे. प्रस्तावित क्षेपणास्त्र संच विक्रीने अमेरिका व भारत यांच्यातील परराष्ट्र धोरण योजना व राष्ट्रीय सुरक्षा यांना बळ मिळणार आहे. राजकीय स्थिरता, शांतता व आर्थिक प्रगती यांना यातून प्राधान्य मिळेल असे डीएससीए या पेंटॅगॉनच्या संस्थेने म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी  यांनी जून २०१६ मध्ये अमेरिकेला भेट दिली होती त्यावेळी अमेरिकेने भारताला महत्त्वाचा संरक्षण भागीदार म्हणून मान्यता दिली होती. त्यात संरक्षण तंत्रज्ञानाचाही समावेश होता. सदर हार्पून संचाच्या विक्रीने भारताची संरक्षण क्षमता अधिक वाढणार असून  त्यात हार्पून क्षेपणास्त्रांची देखभाल करणे सोपे जाणार आहे. यातून मूळ प्रादेशिक लष्करी समतोल ढळणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे असे पेंटॅगॉनने म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Us approves sale of harpoon joint common test sets to india zws

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या