US Arms Sale to China Controversy : चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्याची जगभरात मोठी चर्चा झाली. या दौऱ्यादरम्यान शी जिनपिंग आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चेसह काही महत्वाचे निर्णय झाले. शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यानंतर चीनमधील अमेरिकन राजदूत डेव्हिड परड्यू यांनी एक दावा केला होता.
डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला शस्त्रास्त्रे विकण्याची तयारी दर्शवली असल्याचे डेव्हिड परड्यू यांनी म्हटलं होतं. मात्र, या दाव्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय वादावर ट्रम्प यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “मी असं काहीही ऐकलं नाही. राजदूत कदाचित तैवानबद्दल बोलत असावेत,” असं म्हणत ट्रम्प यांनी हा दावा फेटाळला. तरीही अमेरिकन शस्त्रे जगात सर्वोत्तम असल्याने ही कल्पना वाईट नाही, असंही ट्रम्प म्हणाले. या संदर्भातील वृत्त टाइम्स नाऊने दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
चीनमधील अमेरिकेचे राजदूत डेव्हिड परड्यू यांनी असं म्हटलं होतं की ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांना विचारलं होतं की चीनला अमेरिकेकडून शस्त्रे खरेदी करण्यात रस आहे का? आता डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आपल्याला अशा कोणत्याही संभाषणाबद्दल माहिती नाही.
एका पत्रकाराने ट्रम्प यांना या घडामोडींबाबत प्रश्न विचारला असता ट्रम्प यांनी म्हटलं की, तुमचा प्रश्न चीन की तैवानबाबत आहे? त्यानंतर ट्रम्प यांनी सांगितलं की, “आपण काहीही ऐकलं नाही आणि मला या विषयी डेव्हिड परड्यू यांना विचारावं लागेल. मात्र, हे खरं आहे की अमेरिकन शस्त्रे उत्कृष्ट दर्जाची असल्यामुळे चीनला कदाचित अमेरिकेची लष्करी उपकरणे खरेदी करायची असतील. त्यामुळे ही एक चांगली कल्पना ठरू शकते.”
मेलानिया ट्रम्प यांचा जिनपिंग यांच्याशी हस्तांदोलनास नकार?
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग अमेरिकेच्या दौऱ्यावर होते, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेच्या ‘फर्स्ट लेडी’ मेलानिया ट्रम्प उपस्थित होत्या. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्याशी हस्तांदोलन करत त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर शी जिनपिंग हे हस्तांदोलन करण्यासाठी मेलानिया ट्रम्प यांच्या दिशेने सरकले. पण लगेच मेलानिया ट्रम्प यांनी आपला उजवा हात वर करून थांबण्याचा इशारा करत मागे सरकताना व्हिडीओत दिसत आहेत. त्या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प हे शी जिनपिंग यांच्याबरोबर असलेल्या एका चिनी अधिकाऱ्याशी हस्तांदोलन करताना दिसतात. दरम्यान, मेलानिया ट्रम्प यांनी अशी कृती का केली? हे या व्हिडीओवरून स्पष्ट होत नाही. तसेच याबाबत अद्याप कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण किंवा निवेदन देण्यात आलेलं नाही.
शर्यत लावू, कुस्ती नको! जिनपिंग यांचं आवाहन
‘चीन आणि अमेरिकेदरम्यान निरोगी स्पर्धा असावी, एकमेकांबद्दल शत्रुत्वाची भावना नको’ असं आवाहन चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान केलं. जिनपिंग अमेरिकेच्या शासकीय दौर्यावर असताना ट्रम्प यांनी त्यांचं विमानतळावर जाऊन स्वागत केलं. यावेळी जिनपिंग यांची पत्नी पेंग लिउयान आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प याही उपस्थित होत्या.
जिनपिंग २०१५ नंतर प्रथमच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. जगातील पहिल्या आणि दुसर्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्था असलेल्या या दोन देशांच्या अध्यक्षांच्या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलं होतं. जिनपिंग आणि ट्रम्प यांच्यादरम्यान व्यापार, तंत्रज्ञान, ‘एआय’, लष्करी संबंध, पश्चिम आशियातील तिढा, रशिया-युक्रेन युद्ध, शस्त्रास्त्र स्पर्धा, अमेरिकेकडून तैवानला शस्त्रांची विक्री यासह आदी विषयांवर महत्वाची चर्चा झाल्याचं सांगितलं जातं.
