मध्य पूर्वेमध्ये अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. अमेरिकन लष्कराने बुधवारी पहाटे इराणच्या ‘केशम’ बेटावर मोठे हल्ले केले आहेत. ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ’ या अत्यंत महत्त्वाच्या सागरी क्षेत्राजवळ असलेल्या या बेटावर अमेरिकेने ही कारवाई केली. इराणने आपल्या शेजारील देशांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केल्यानंतर अमेरिकेने हे ‘स्वसंरक्षणार्थ’ पाऊल उचलल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, या संघर्षामुळे संपूर्ण आखाती देशांमध्ये युद्धाचा भडका उडण्याची भीती निर्माण झाली आहे.
इराणचा शेजारी देशांवर हल्ला; कुवेत अन् बहारीन लक्ष्य
अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर अधिकृत माहिती देताना सांगितले की, इराणने आपल्या शेजारी देशांना लक्ष्य करत एकामागून एक अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती. मात्र, इराणचे हे सर्व हल्ले अपयशी ठरले असून त्यांना नियोजित लक्ष्यांचा वेध घेता आलेला नाही.
सेंट्रल कमांडच्या माहितीनुसार:
- कुवेतवरील हल्ला अपयशी: इराणने कुवेतच्या दिशेने डागलेली दोन क्षेपणास्त्रे लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच हवेतच कोसळली किंवा त्यांचे तुकडे झाले.
- बहरीनमध्ये अमेरिकेची ढाल: इराणने बहारीनच्या दिशेने तीन क्षेपणास्त्रे डागली होती. मात्र, अमेरिका आणि बहारीनच्या हवाई संरक्षण यंत्रणेने (Air Defense System) ही क्षेपणास्त्रे अत्यंत तत्परतेने हवेतच नष्ट केली.
या प्राणघातक हल्ल्यांनंतर बहारीन आणि कुवेतमध्ये युद्धकालीन परिस्थिती निर्माण झाली असून, दोन्ही देशांमध्ये नागरिकांना सतर्क करण्यासाठी धोक्याचे सायरन (Air raid sirens) वाजवण्यात आले. ‘अल जझीरा’ या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
संघर्षाची ठिणगी कशी पडली?
इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने (IRGC) दावा केला आहे की, अमेरिकेने आधी ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ’ जवळ इराणच्या एका तेलवाहू जहाजावर (ऑइल टँकर) हल्ला केला होता. अमेरिकेच्या या हल्ल्यात इराणच्या जहाजाच्या इंजिन रूमचे मोठे नुकसान झाले होते. या कारवाईला चोख प्रत्युत्तर म्हणून इराणने अमेरिका आणि इस्रायलच्या एका संयुक्त जहाजावर सागरी क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केल्याचे इराणकडून सांगण्यात आले.
त्यानंतर अमेरिकेने इराणच्या केश्म बेटाच्या दक्षिण भागात असलेले ‘IRGC’चे दळणवळण केंद्र (Communications Tower) आणि लष्करी तळांना लक्ष्य केले.
अमेरिकन नौदलाच्या तळावर इराणचा दावा; अमेरिकेचा इन्कार
केश्म बेटावरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या इराणने थेट अमेरिकेच्या मुख्य तळांना उडवण्याचा प्रयत्न केला. इराणच्या ‘IRGC’ ने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या सहाय्याने बहरीनमध्ये असलेल्या अमेरिकेच्या ‘फिफ्थ फ्लीट’ (US Fifth Fleet) या नौदलाच्या मुख्यालयावर आणि एका हवाई तळावर हल्ला केल्याचा दावा केला आहे.
अमेरिकेचे इराणला चोख प्रत्युत्तर
अमेरिकेने इराणचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. सेंट्रल कमांडने स्पष्ट केले आहे की, “अमेरिकन फौजांवर करण्यात आलेले इराणचे सर्व हल्ले पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. अमेरिकन लष्कर अत्यंत सतर्क असून, इराणच्या कोणत्याही आक्रमकतेला चोख प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहे.” या नव्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या पुरवठ्यावर आणि वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिका आणि इराणमधील हे ‘थेट युद्ध’ आता काय वळण घेते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
