US Attacks Venezuela Over Oil Rare Earth Minerals : व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांचे सपत्नीक अपहरण करून त्यांना अमेरिकेत आरोपी म्हणून आणून उभे करण्याची डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाची कृती थक्क करणारी आहे. पण या मोहिमेचे नियोजन कित्येक महिने सुरू होते. तेलसमृद्ध पश्चिम आशियाकडून अमेरिकेने आपला मोर्चा संसाधन समृद्ध दक्षिण अमेरिकेडे वळवल्याचे हे स्पष्ट लक्षण आहे. केवळ समृद्ध तेलसाठेच नव्हे, तर रेअर अर्थ (दुर्मिळ संयुगे) इतर खनिज संपत्तीने समृद्ध असलेला व्हेनेझुएला हा अमेरिकेसाठी दीर्घकालीन गुंतवणूक ठरू शकतो.

कारवाईचे कारण काय?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, तसेच त्यांच्या प्रशासनातील काही उच्चपदस्थांनी मादुरो यांच्या विरुद्ध कारवाईची वेगवेगळी कारणे दिली आहेत. त्यात प्रामुख्याने नार्को-टेररिझम (अमली पदार्थांच्या तस्करीबरोबरीने दहशतवादी कृत्ये), अमेरिकेमध्ये बेकायदे अमली पदार्थ पाठवणे, मशीनगनसारखी शस्त्रास्त्रे बेकायदा पाठवून अमेरिका अस्थिर करणे, खनिज तेलाची अवैध वाहतूक आणि काळाबाजार यांचा समावेश होतो. निकोलस मादुरो हे व्हेनेझुएलाचे अध्यक्ष गेली अनेक वर्षे आहेत. त्यांनी लोकशाही व्यवस्थेची थट्टा चालवली, विरोधकांची गळचेपी केली, निवडणूक जिंकलेल्या विरोधकांना भूमिगत होण्यास भाग पाडले, काही प्रमाणात अमली पदार्थांच्या तस्करी व्यवस्थेला राजाश्रय दिला हे अमान्य करता येणार नाही.

पण ते एका सार्वभौम देशाचे प्रमुख आहेत आणि अमेरिकेने सादर केलेल्या किरकोळ कारणांसाठी एखाद्या तस्कर वा दहशतवाद्याप्रमाणे त्यांच्या निवासस्थानी शिरून, त्यांच्या मुसक्या आवळून, पत्नीसह त्यांना अमेरिकेत आणून येथील चौकशी यंत्रणांसमोर हजर करणे ही अमेरिकेची कृती सर्व आंतरराष्ट्रीय संकेत आणि कायद्यांचा भंग करणारी ठरते, हे नक्की. गेले सहा महिने अमेरिकेने या कारवाईची तयारी चालवली होती. कॅरेबियन समुद्रात व्हेनेझुएलाच्या तेलवाहू जहाजांची कोंडी करण्यात येत होती. अमली पदार्थांची वाहतूक करण्याच्या निव्वळ संशयावरून काही बोटींवर अमेरिकेच्या सैन्यदलांकडून गोळीबार आणि बॉम्बफेक सुरू होती. यांत अनेकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये खरोखर अमली पदार्थांचे तस्कर किती होते, सर्वसामान्य नागरिक किती होते याची मोजदाद स्वतंत्रपणे झालेली नाही. सीआयए या अमेरिकेच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय गुप्तहेर संघटनेला मदुरो राजवटीविरुद्ध ‘कारवाई करण्याचे आदेश’ ट्रम्प यांनी पूर्वीच दिले होते.    

‘मन्रो डॉक्ट्रिन’, ‘डॉन्रो डॉक्ट्रिन’

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष जेम्स मन्रो यांनी पश्चिम गोलार्धातून युरोपिय वसाहतवादी सत्तांनी बाहेर पडावे अशी सूचना केली. त्या काळात दक्षिण अमेरिका प्रामुख्याने स्पॅनिश वसाहतवाद्यांच्या ताब्यात होता. उत्तर अमेरिकेतून ब्रिटन, फ्रान्स, स्पेन अशा युरोपिय सत्तांना बाहेर काढण्यात अमेरिकेला यश आले होते. पण दक्षिण व मध्य अमेरिकेत स्पॅनिश, पोर्तुगीज, डच वसाहती त्याहीवेळी मोठ्या प्रमाणात होत्या. हा टापू अमेरिकेच्या आधिपत्याखाली यावा ही जेम्स मन्रो यांची मनिषा होती. त्या बदल्यात पूर्व गोलार्धातील युरोपिय हितसंबंधांमध्ये अमेरिका ढवळाढवळ करणार नाही अशी हमी त्यांनी दिली. हेच ते मन्रो डॉक्ट्रिन किंवा मन्रो जाहीरनामा. या विस्तारवादाचे आकर्षण ट्रम्प यांनाही आहेच. मन्रो डॉक्ट्रिनची अंमलबजावणी त्यांना करायची आहे.

या योजनेचे नामकरणही त्यांनी त्यांच्या पहिल्या नावावरून (डोनाल्ड) ‘डॉन्रो डॉक्ट्रिन’ (Donroe Doctrine) असे केले आहे. पश्चिम गोलार्ध म्हणजे प्राधान्याने उत्तर व दक्षिण अमेरिका. तेव्हा दक्षिण गोलार्धातील देशांनी अमेरिकेचे अंकित राहावे असे स्वप्न बाळगणारे ट्रम्प हे पहिले अध्यक्ष नव्हेत. आजपासून बरोबर ३६ वर्षांपूर्वी थोरले जॉर्ज बुश यांच्या प्रशासनाने पनामात मॅन्युएल नोरिएगा यांना अटक करून तेथील राजवट संपवली होती. साठ वर्षांपूर्वी फिडेल कॅस्ट्रोंच्या क्युबाविरुद्ध केनेडी-जॉन्सन-निक्सन यांच्या प्रशासनांनीही कुरापती काढल्या, पण कॅस्ट्रो या सर्वांना पुरून उरले. दक्षिण अमेरिकेतील डाव्या किंवा डावीकडे कललेल्या राजवटींना अस्थिर करायचे (क्युबा, निकाराग्वा, व्हेनेझुएला), त्यांना व्हेनेझुएलाच्या तेलापासून तोडायचे नि आता या टापूत स्थिरावू पाहणाऱ्या चीन आणि रशिया या महासत्तांना माघारी पाठवायचे ही ट्रम्प प्रशासनाची घोषित योजना. या योजनेचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे व्हेनेझुएलावरील कारवाई. हेच ते डॉन्रो डॉक्ट्रिन!

व्हेनेझुएलाच का?

व्हेनेझुएलाकडे प्रचंड खनिज तेलसाठे आहेत. याबाबतीत या देशाचा क्रमांक जगात अव्वल आहे. व्हेनेझुएलानंतर सौदी अरेबिया, इराण, कॅनडा, इराक, यूएई, कुवेत आदींचा क्रमांक येतो.  व्हेनेझुएला हा तेल निर्यातदार देशांच्या संघटनेचा (ओपेक) एक संस्थापक सदस्य. पृथ्वीतलावरील एकूण खनिज तेलसाठ्यापैकी सर्वाधिक म्हणजे जवळपास २० टक्के साठे व्हेनेझुएलात असावेत असा अंदाज आहे. अंदाजे जवळपास ३०३ अब्ज पिंपे इतके हे तेल असू शकते. व्हेनेझुएला केवळ तेलसमृद्ध नाही. इतरही नैसर्गिक साधनसंपत्ती या देशात मुबलक आढळून येते. जगातील सहाव्या क्रमांकाचे नैसर्गिक वायूचे साठे येथे सापडतात. सोने, लोह, बॉक्साइट आणि हिरे आढळतात. याशिवाय आधुनिक युगात कळीच्या ठरलेल्या दुर्मिळ मूलद्रव्ये आणि संयुगांपैकी काही – थोरियम, कोल्टन, चुंबकीय गुणधर्म असलेली रासायनिक संयुगे – या देशात मोठ्या प्रमाणात आढळून आली आहेत.

सोन्याच्या बाबतीत या देशाचा क्रमांक दक्षिण अमेरिकेत पहिला आहे. जगातील १२व्या क्रमांकाचे लोहसाठे, १५व्या क्रमांकाचे बॉक्साइट साठे आढळून येतात. हे समृद्ध साठे व्हेनेझुएलाच्या १२ टक्के भूभागातील खाणींमध्ये उत्खनित होऊ शकतात असा अंदाज आहे. ओरिनिको नदीच्या खोऱ्यात हा टापू येते. येथे जवळपास ८ हजार टन सोन्याचे साठे आढळले आहेत. मात्र तेलसाठे किंवा संसाधन संपत्ती समृद्ध असली, तरी त्यांचे उत्पादन घेण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान, द्रष्टेपणा, सातत्य, प्रामाणिकपणा मादुरो राजवटीने दाखवला नाही. व्हेनेझुएलाचे खनिज तेल उत्पादन एकूण जागतिक उत्पादनाच्या एक टक्काही नाही. खनिज प्रदेशामध्ये माफिया आणि तस्करांचा बोलबाला आहे.

अनेक दुर्मिळ संयुगांच्या उत्खननास मादुरो सरकारने राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा दिला आणि त्यासाठीची कंत्राटे मादुरो यांच्या स्वकीयांस आणि मित्रमंडळींमध्ये वाटली गेली. या विशाल खनिजसंपत्तीवर ताबा मिळवून चीनची मक्तेदारी मोडीत काढण्याचेही ट्रम्प यांचे मनसुबे आहेत. तेलसाठ्यावर नियंत्रण मिळवून पश्चिम आशिया आणि रशियाची या क्षेत्रातली सद्दी संपवण्याची ट्रम्प यांची योजना आहे. या सगळ्यासाठी व्हेनेझुएला हा देश आदर्श ठरतो. शिवाय लष्करी दृष्ट्या त्या देशाकडून फार प्रतिकारही अपेक्षित नव्हता. यामुळेच दक्षिण अमेरिकेवर ताबा मिळवण्याच्या भविष्यकालीन अमेरिकी योजनेअंतर्गत पहिली कारवाई व्हेनेझुएलावर झाली.

siddharth.khandekar@expressindia.com