वॉशिंग्टन : अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पलोसी यांनी तैपेई (तैवान) दौरा केल्यानंतर संतप्त झालेल्या चीनने तैवानभोवती सुरू केलेले लष्करी सराव ताबडतोब थांबवावेत, असे आवाहन अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया आणि जपानने चीनला केले आहे. तैवानच्या सामुद्रधुनीत शांतता आणि स्थैर्य राखण्याच्या आपण कटिबद्ध असल्याची ग्वाहीही या तिन्ही राष्ट्रांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कंबोडियाची राजधानी नोम पेन्ह येथे सुरू असलेल्या ५५ व्या ‘असोसिएशन ऑफ साउथ इस्ट एशियन नेशन्स’ (असिआन) परराष्ट्रमंत्री स्तरीय बैठकीदरम्यान झालेल्या भेटीनंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकेन, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वाँग, जपानचे परराष्ट्रमंत्री हायाशी योशिमासा यांनी संयुक्त निवेदन दिले आहे.

तैवान दौरा करणाऱ्या ८२ वर्षीय पलोसी गेल्या २५ वर्षांतील पहिल्या अमेरिकेत उच्चस्तरीय पदाधिकारी ठरल्या. त्यांनी गेल्या बुधवारी तैवानचे अध्यक्ष त्साई इंग वेन आणि इतर नेत्यांची भेट घेतली. त्यामुळे चीन संतप्त झाला आहे. स्वयंशासित लोकशाहीवादी बेट असलेल्या तैवानला चीन आपला भूभाग मानतो. प्रसंगी लष्करी बळाने तैवानला चीनमध्ये समील करून घेण्याची चीनची इच्छा आहे. चीनने तैवानभोवती सुरू केलेल्या लष्करी सरावादरम्यान तैवानभोवतीच्या समुद्रात क्षेपणास्त्रांचा मारा केला होता.

अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी निवेदनात नमूद केले आहे, की या प्रदेशात शांतता-स्थैर्यासाठी मुत्सद्देगिरी-वाटाघाटींची गरज आहे. अन्यथा चुकीच्या मूल्यांकनातून प्रदेशात अस्थैर्य निर्माण होण्याचा धोका आहे. या संदर्भात चीन सध्या करत असलेल्या आक्रमक लष्करी सरावांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली, त्यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता, स्थैर्य आणि सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. चीनने डागलेल्या क्षेपणास्त्रांप्रकरणी या निवेदनात निषेध करण्यात आला आहे. यापैकी पाच क्षेपणास्त्रे जपानच्या विशेष आर्थिक विभागात पडल्याचा दावा जपानने केला आहे. ज्यामुळे परिसरात तणाव वाढून सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या संयुक्त निवेदनात चीनला हे लष्करी सराव तत्काळ थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘असिआन’ने तैवानच्या सामुद्रधुनीत तणाव निवळण्याचे महत्त्व अधोरेखित करण्याचे आवाहनपर निवेदन प्रसिद्ध केल्याबद्दल अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया आणि जपानने ‘असिआन’चे आभार मानले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us australia japan urge china to cease military exercises around taiwan zws 70
First published on: 08-08-2022 at 05:06 IST