Nikhil Kamath Poadcast with Elon Musk: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला, स्पेसएक्स अशा टेक कंपन्यांचे सीईओ एलॉन मस्क यांनी भारताचे तरूण व्यावसायिक, झिरोधाचे सहसंस्थापक निखिल कामथ यांच्या पॉडकास्टमध्ये सहभाग घेतला होता. भारत आणि अमेरिकेमध्ये निर्माण झालेला तणाव, एच-१बी व्हिसावरील निर्बंध या पार्श्वभूमीवर एलॉन मस्क यांनी भाष्य केले आहे. भारतातील प्रतिभावान कर्मचाऱ्यांमुळे अमेरिकेला लाभ झाला आहे, हे मस्क यांनी मान्य केले.
निखिल कामथ यांच्या डब्लूटीएफ इज या पॉडकास्टमध्ये बोलत असताना मस्क म्हणाले, भारतीय इंजिनिअर्स, शास्त्रज्ञ आणि उद्योजकांनी अमेरिकेच्या तंत्रज्ञान आणि व्यवसाय वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कामथ यांनी चर्चेच्या सुरुवातीला म्हटले की, अमेरिकेने जगभरातील हुशार लोकांना स्वतःकडे आकर्षित केले होते. आज अमेरिकेत अनेक मोठ्या कंपन्यांचे सीईओ भारतीय आहेत.
एलॉन मस्क यांनी निखिल कामथ यांच्या विधानावर सहमती दर्शवली. तसेच बिगर अमेरिकी लोकांमुळे स्थानिकांच्या नोकऱ्या हिरावल्या जात आहेत, या अमेरिकेच्या चिंतेवरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, “मला माहीत नाही, हे किती खरे आहे. पण माझ्या निरीक्षणानुसार प्रतिभावान लोकांची नेहमीच कमतरता जाणवत असते. अवघड कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रतिभावान लोकांच्या शोधात असतो. यात अडचणीही येतात. त्यामुळे अधिक प्रतिभावान लोक असणे चांगलेच आहे.”
एलॉन मस्क म्हणाले की, आमच्या टेस्ला, स्पेसएक्स आणि एक्स या कंपन्या जगातील सर्वात प्रतिभावान लोक शोधण्यावर लक्ष केंद्रित करतात.
एच-१बी व्हिसावर भाष्य
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने एच-१बी व्हिसावर निर्बंध आणले आहेत. या व्हिसाचा बराच फायदा भारतीय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी घेतला होता. यावर बोलताना एलॉन मस्क म्हणाले की, “मला वाटते एच-१बी व्हिसा कार्यक्रमाचा काही कंपन्यांनी चुकीचा वापर केला आहे. काही कंपन्यांनी यंत्रणेशी खेळ केला असून या उपक्रमाचा लाभ उचलला. यंत्रणेशी अशाप्रकारे कुणालाही खेळता येणार नाही.”
गैरवापर झाला असला तरी ही प्रणाली पूर्णपणे बंद करावी, या मताचा मी नाही, असेही मस्क म्हणाले. “एच-१बी कार्यक्रम बंद करावा या विचारांचा मी नाही. मला वाटते, यामुळे त्यांनाच (अमेरिकेला) याचा तोटा होईल”, असेही मस्क यांनी सांगितले.
