रॉयटर्स, वॉशिंग्टन

अमेरिकेचे ॲटर्नी जनरल पाम बोंडी यांची उचलबांगडी केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याचा विचार करत आहेत, असे व्हाइट हाऊसमधील अंतर्गत चर्चांची माहिती असलेल्या पाच जणांनी नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर सांगितले. इराणविरुद्ध युद्धाचे अमेरिकेत होणाऱ्या राजकीय परिणामांमुळे ट्रम्प निराश झाले आहेत, अशी माहिती या सूत्रांनी दिली.

युद्ध सुरू झाल्यापासून पाच आठवड्यांच्या कालावधीत अमेरिकेत पेट्रोलचे दर वाढले आहेत, ट्रम्प यांच्या लोकप्रियतेचा आलेख घसरला आहे आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्यावधी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या भवितव्याबद्दल चिंता वाढत आहे. ट्रम्प यांनी बुधवारी दूरचित्रवाणीवरून राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण फसले असल्याचे काही मित्र पक्षांचे म्हणणे आहे. युद्धाची स्थिती नियंत्रणात आहे आणि अध्यक्षांना त्याबद्दल आत्मविश्वास असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न हा या भाषणाचा उद्देश होता, असे व्हाइट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

फेरबदलामध्ये नेमक्या कोणत्या मंत्र्यांची गच्छंती होईल याबद्दल सूत्रांनी काहीही सांगितले नाही. पण एकापेक्षा अधिक मंत्र्यांचे स्थान धोक्यात असल्याचे त्यांनी सांगतिले. इतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी गॅबार्ड, वाणिज्यमंत्री हॉवर्ड लुटनिक यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. ट्रम्प हे अलीकडे गॅबार्ड यांच्यावर नाराज असल्याचे वृत्त आहे. तर लुटनिक यांनी २०१२मध्ये जेफ्री एप्स्टीनबरोबर भोजन घेतल्याचे उघड झाले आहे. मात्र, आपला एप्स्टीनशी काहीही संबंध नसल्याचा लुटनिक यांचा दावा आहे.