US Russia Sanctions Double Standard: रशियाकडून कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करणाऱ्या भारतासह चीनसारख्या देशांवर १०० टक्क्यांपर्यंत आयातशुल्क आणि कठोर निर्बंध लादण्याची तयारी करणाऱ्या अमेरिकेचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. इतरांवर बंधने लादणाऱ्या अमेरिकेने स्वतःच्या अण्वस्त्र आणि नागरी अणुऊर्जा प्रकल्पांसाठी आवश्यक असणाऱ्या युरेनियमच्या आयातीबाबत मात्र स्वतःसाठी सोयीस्कर पळवाट ठेवली आहे. रशियाशी नागरी सहकार्य आणि अणुइंधन पुरवठा सुरू ठेवता यावा, यादृष्टीने नव्या विधेयकात मुभा देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहाने बुधवारी ‘द लिंडसे ओ. ग्रॅहम रशिया आणि इराण निर्बंध कायदा, २०२६’ या विधेयकाला मंजुरी दिली. या विधेयकानुसार, रशियाकडून कच्चे तेल किंवा नैसर्गिक वायू खरेदी सुरू ठेवणाऱ्या अथवा रशियावरील निर्बंध झुगारणाऱ्या देशांतील उत्पादनांवर १०० टक्क्यांपर्यंत आयातशुल्क आकारण्याचे अधिकार राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना बहाल करण्यात आले आहेत. मात्र, याच सर्वसमावेशक निर्बंध विधेयकामध्ये रशियाकडून युरेनियम खरेदीविषयी स्वतःसाठी ठेवलेली सवलत चर्चेचा विषय ठरत आहे.

विधेयकात नेमकी कोणती पळवाट?

विधेयकातील कलम १११ नुसार, रशियाच्या ‘रोसॅटॉम स्टेट अ‍ॅटोमिक एनर्जी कॉर्पोरेशन’ आणि तिच्या उपकंपन्यांकडून होणाऱ्या युरेनियम आयातीवर विद्यमान कायद्यानुसार निर्बंध लागू करण्याचे निर्देश राष्ट्राध्यक्षांना दिले आहेत. मात्र, त्याच वेळी कलम ११४ अंतर्गत दोन महत्त्वाच्या सवलतींची तरतूद करण्यात आली आहे.

यातील पहिल्या तरतुदीनुसार, ‘अ‍ॅटोमिक एनर्जी अ‍ॅक्ट’च्या कलम १२३ अंतर्गत अमेरिका आणि रशिया यांच्यात झालेल्या नागरी अणुसहकार्य करारातील उपक्रमांवर कोणतेही निर्बंध लागू होणार नाहीत. तर दुसऱ्या तरतुदीनुसार, अणुभट्ट्यांसाठी लागणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या ‘लो-एनरिच्ड’ युरेनियमच्या आयातीला तसेच वैद्यकीय समस्थानिकांच्या खरेदीला निर्बंधांमधून वगळण्यात आले आहे.

याचाच अर्थ रशियाशी संपूर्ण आण्विक व्यवहारांवर पूर्णपणे बंदी घालण्याऐवजी अमेरिकेने स्वतःची गरज लक्षात घेऊन सवलतींची नवी व्यवस्था कायम ठेवली आहे.

अमेरिकेची रशियन युरेनियमवरील निर्भरता

आर्थिक स्तरावर रशियावरील अवलंबित्व कमी करण्याचे दावे अमेरिकेकडून सातत्याने केले जात असले, तरी अणुइंधनाच्या बाबतीत वास्तव पूर्णपणे वेगळे आहे. युरेनियम संवर्धन प्रक्रियेत रशिया जागतिक पातळीवर आघाडीवर आहे.

कच्च्या तेलाप्रमाणे युरेनियम थेट वापरता येत नाही; व्यावसायिक अणूभट्ट्यांमध्ये वापरण्यासाठी त्याचे रूपांतरण आणि संवर्धन यांसारख्या अनेक जटिल प्रक्रियांमधून जावे लागते. या प्रक्रियेमध्ये रशियाचे जागतिक बाजारपेठेवर मोठे नियंत्रण आहे.

ट्रम्प यांच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचा कायदा होणार

युक्रेन युद्धासाठी रशियाला मिळणारी आर्थिक रसद रोखणे आणि रशियाच्या तेल-वायू खरेदीदारांवर दबाव निर्माण करणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश असल्याचे सिनेटच्या परराष्ट्र संबंध समितीने स्पष्ट केले आहे. कनिष्ठ सभागृहात हे विधेयक २६२ विरुद्ध १५९ मतांनी मंजूर झाले; यात ५८ डेमोक्रॅटिक खासदारांनीही सत्ताधारी रिपब्लिकनांच्या बाजूने मतदान केले.

यापूर्वी सिनेटने ८६ विरुद्ध ११ अशा मोठ्या बहुमताने याला मंजुरी दिली होती. आता हे विधेयक स्वाक्षरीसाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे पाठवण्यात आले असून, लवकरच त्यावर स्वाक्षरी होऊन त्याचे कायद्यात रूपांतर होण्याची शक्यता आहे.