अणुकराराचे काटेकोर पालन केल्याने अमेरिका व युरोपीय महासंघाचा निर्णय
अणुकरारातील अटी-शर्तीचे काटेकोर पालन केल्यामुळे इराणवर लादलेले कठोर आर्थिक र्निबध अमेरिका व युरोपीय महासंघाने रविवारी उठवले. मात्र, त्याचवेळी इराणने राबवलेल्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावरून अमेरिकेने पुन्हा नवीन र्निबध लादले. ‘नव्या र्निबधांना योग्य तो प्रतिसाद दिला जाईल’, असे प्रत्युत्तर इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांनी दिले आहे.
इराण अण्वस्त्रांची निर्मिती करत असल्याच्या संशयावरून त्याच्यावर गेल्या काही वर्षांपासून कठोर आर्थिक र्निबध लादण्यात आले होते. तेलसाठय़ांच्या बाबतीत समृद्ध असलेल्या इराणची अर्थव्यवस्था या आर्थिक र्निबधांमुळे मोडकळीस
आली होती. या पाश्र्वभूमीवर गेल्या वर्षी १४ जुलै रोजी इराणने अमेरिकेसह ब्रिटन, रशिया, चीन, फ्रान्स व
जर्मनी या देशांशी करार केला होता. त्यानुसार इराणने आपल्या अणुकार्यक्रमावर बंधने घालण्याचे मान्य केले होते.
इराणने अणुकरारात मान्य केलेल्या अटींचे पालन होते काय, याची तपासणी संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षकांनी केली. त्यात इराण कराराचे काटेकोर पालन करत असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी इराणवरील र्निबध उठवण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली.

र्निबध उठल्याने इराणला मिळणारा लाभ
* आंतरराष्ट्रीय बाजारात इराणचे तेल विकले जाऊ शकेल. त्यातून अब्जावधी डॉलरची कमाई होऊन इराणची अर्थव्यवस्था रुळावर येण्यास मदत होणार आहे
* इराणच्या १०० अब्ज डॉलर किमतीच्या मालमत्ता गोठवण्यात आल्या होत्या. त्या खुल्या करण्यात आल्या आहेत
* इराणच्या बँका आता जागतिक पातळीवर व्यवहार करू शकतील
* इराणचे अन्नपदार्थ, गालिचे व व्यावसायिक विमानांचे सुटे भाग यांचा व्यापार सुरू होऊ शकेल

अणुकरारातील अटी काय होत्या?
* युरेनियमचे सेंट्रीफ्युजेस दोनतृतीयांशने कमी करणे
* युरेनियमचा साठा कमी करणे
* शस्त्रयोग्य प्लुटोनियमची निर्मिती करणाऱ्या ‘अराक’ अणुभट्टीचा गाभा बंद करणे