वॉशिंग्टन : ‘‘चीन आणि अमेरिकेदरम्यान निरोगी स्पर्धा असावी, एकमेकांबद्दल शत्रुत्वाची भावना नको,’’ असे आवाहन चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी केले आहे. जिनपिंग अमेरिकेच्या शासकीय दौर्यासाठी भारतीय वेळेनुसार गुरुवारी पहाटे (स्थानिक वेळेनुसार बुधवारी संध्याकाळी) अमेरिकेत दाखल झाले. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी विमानतळावर जाऊन त्यांचे स्वागत केले.
जिनपिंग यांनी गुरुवारी सकाळी व्हाइट हाऊसमध्ये जाऊन ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी जिनपिंग यांची पत्नी पत्नी पेंग लिउयान आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प याही उपस्थित होत्या. जिनपिंग २०१५नंतर प्रथमच अमेरिकेला गेले असून जगातील पहिल्या आणि दुसर्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्था असलेल्या या दोन देशांच्या अध्यक्षांच्या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. जिनपिंग आणि ट्रम्प यांच्यादरम्यान व्यापार, तंत्रज्ञान, ‘एआय’, लष्करी संबंध, पश्चिम आशियातील तिढा, रशिया-युक्रेन युद्ध, शस्त्रास्त्र स्पर्धा, अमेरिकेकडून तैवानला शस्त्रांची विक्री या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्षी जिनपिंग यांच्याशी असलेल्या ‘खर्याखुर्या थोर मैत्री’ची प्रशंसा केली. ही मैत्री परस्पर आदर आणि आमच्या जनतेचे महत्त्वाचे हितसंबंध यावर आधारलेली आहे, असे ट्रम्प म्हणाले. तर, क्षी जिनपिंग यांनी एक लाख अमेरिकी युवकांना चीनमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. तसेच अटलांटामधील प्राणिसंग्रहालयात दोन विशाल पांडा पाठवण्याचे आश्वासन दिले.
एआयविषयी भूमिका स्पष्ट करताना जिनपिंग म्हणाले, ‘‘चांगल्या कामासाठी एआय विकसित करण्याची, तसेच त्याचे व्यवस्थापन करण्याची चीन आणि अमेरिकेकडे क्षमता व जबाबदारी दोन्ही आहे. तसेच एआयचा वापर मानवी नियंत्रणाखालीच असावी याची दोन्ही देशांनी खबरदारी घ्यावी,’’ असे जिनपिंग म्हणाले.
थेट प्रक्षेपणावर परिणाम!
व्हाइट हाऊसने ‘सीएनएन’, ‘एमएस नाऊ’ आणि ‘पॉलिटिको’वर घातलेल्या बंदीच्या निषेधार्ध अमेरिकेच्या वृत्तवाहिन्यांनी ट्रम्प-जिनपिंग भेटीचे थेट प्रक्षेपण केले नाही. दरम्यान, या बंदीच्या निर्णयाला अमेरिकी न्यायालयाने १४ दिवसांची स्थगिती दिली आहे. गुरुवारी सकाळी या माध्यमांच्या प्रतिनिधींना व्हाइट हाऊसमध्ये प्रवेश करू द्यावा, असे न्यायालयाने आदेशात म्हटले. त्यानंतर काही तासांनी ‘सीएनएन’, ‘एमएस नाऊ’ आणि ‘पॉलिटिको’चे व्हाइट हाऊसमधून वार्तांकन पूर्ववत सुरू झाले. पण तोपर्यंत ट्रम्प आणि जिनपिंग यांच्या भेटीच्या वार्तांकनावर त्याचा परिणाम झाला होता.
व्यापारयुद्धातील शस्त्रसंधीला मुदतवाढ
वॉशिंग्टन : अमेरिका आणि चीनने व्यापारयुद्धातील शस्त्रसंधी कराराची मुदत दोन महिन्यांनी वाढविली आहे. दोन्ही देशांमध्ये आणखी व्यापक स्तरावर करार करण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी ही माहिती दिली. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचे अमेरिकेत आगमन झाल्यानंतर काही वेळातच बेसेंट यांनी ही माहिती दिली. हा करार नोव्हेंबरमध्ये संपणार होता. आता तो पुढील वर्षी १० जानेवारी रोजी संपेल. चीनने याला दुजोरा दिलेला नाही.
ज्याप्रमाणे युद्ध (दुसरे महायुद्ध) जिंकण्यासाठी आमच्या जनतेने एकत्र काम केले त्याचप्रमाणे दोन्ही देशांच्या अधिक चांगले भविष्य घडवण्यासाठी अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि मी एकत्रितपणे काम करू. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका
स्पर्धा निरोगी असावी आणि त्याला मर्यादा असावी. ही एकमेकांना गाठण्याची शर्यत असावी, कोणातरी एकाचा विजय किंवा हार ठरवणारी कुस्ती नसावी. – क्षी जिनपिंग, अध्यक्ष, चीन
