पीटीआय, बीजिंग
चीन आणि अमेरिकेमध्ये आर्थिक आणि व्यापारी स्तरावर झालेल्या चर्चेमध्ये १० मुद्द्यांवर सहमती झाली असून, त्यात ३० अब्ज डॉलर किमतीच्या आयातीवरील परस्परांवर लागू असलेल्या आयातशुल्कातील कपातीचा समावेश आहे. तसेच, कृत्रिम बुद्धिमत्तेवर चर्चेसाठी नियोजन करण्याचे ठरले आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली.
अमेरिका ‘सर्वाधिक पसंतीच्या देशां’ना जे आयातशुल्क लावते, साधारण तेवढेच आयातशुल्क ३० अब्ज डॉलर किमतीच्या आयात मालावर अमेरिका लावणार आहे. यामध्ये चीनमधील खेळणे, घरातील आवश्यक वस्तू, बाळांसाठीची उत्पादने, स्वयंपाकघर आणि स्वच्छतागृहाती उत्पादने आदींचा समावेश आहे. चीनकडूनही अमेरिकेच्या वस्तूंवरील आयातशुल्कात कपात केली जाणार आहे. यामध्ये शेती उत्पादने, वैद्यकीय साधने, कोळसा आदींचा समावेश आहे.
चीन आणि अमेरिकेच्या आर्थिक आणि व्यापारी प्रतिनिधींनी २० ते २३ सप्टेंबरदरम्यान न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन येथे चर्चा केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात होणाऱ्या चर्चेपूर्वी व्यापारी प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली. रशियाकडून तेलखरेदी करीत असलेल्या देशांवर १०० टक्के आयातशुल्क लावण्याचा अधिकार ट्रम्प यांना देण्याचा कायदा अमेरिकेत जिनपिंग येण्यापूर्वी संमत झाला. मात्र, जिनपिंग यांच्याबरोबरील भेटीमध्ये या कायद्याचा नामोल्लेखही ट्रम्प यांनी केला नाही. अमेरिकेच्या दुसऱ्या देशातील व्यापारामधील हस्तक्षेपाला चीनने आक्षेप घेतला आहे. ट्रम्प-जिनपिंग यांच्या संयुक्त निवेदनात दुर्मीळ खनिजांविषयीही काही भाष्य केलेले नाही.
