बांगलादेशमध्ये दुर्गापूजा उत्सवादरम्यान झालेला हिंसाचार आणि अज्ञात धर्मांधांनी केलेली तोडफोड या घटनांमुळे भारतातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या घटनेमध्ये ४ जण ठार झाले असून अनेक जखमी झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे बांगलादेशमध्ये धार्मिक कट्टरतावाद वाढू लागल्याची टीका होऊ लगली आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायावर होत हल्ल्यांचा अमेरिकेने निषेध केला आहे.

“धर्माचे किंवा विश्वासाचे स्वातंत्र्य हा मानवी हक्क आहे. जगभरातील प्रत्येक व्यक्तीला त्यांचा धार्मिक संबंध किंवा श्रद्धा विचारात न घेता त्यांचे महत्त्वाचे सण साजरे करताना सुरक्षित वाटले पाहिजे. आम्ही बांगलादेशातील हिंदू समुदायावरील हल्ल्याच्या घटनांचा निषेध करतो” असे परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले.

दरम्यान, बांगलादेशी हिंदू समुदायाचे सदस्य प्रणेश हलदर यांनी एका निवेदनात “बांगलादेशातील हिंदूंना आणखी कोणतीही हानी पोहोचू नये याची खातरजमा करावी” असे आवाहन त्यांनी अमेरिकेतील वॉचडॉग ग्रुपला आणि माध्यमांना केले. रविवारी, बांगलादेशी हिंदूंनी बांगलादेशातील दुर्गा पूजेच्या उत्सवांच्या वेळी मोठ्या प्रमाणावर झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी दूतावासासमोर निदर्शने केली.

बांगलादेशमध्ये हिंदूंची घरे पेटवली..

बांगलादेशात गेल्या आठवड्यात दुर्गापूजा उत्सवादरम्यान हिंदू मंदिरांचा विध्वंस करण्यात आल्याच्या घटनांविरुद्ध अल्पसंख्याक हिंदूंची निदर्शने सुरू असतानाच; समाजमाध्यमावरील एका कथित ईश्वरनिंदात्मक पोस्टच्या मुद्यावर जमावाने बांगलादेशातील हिंदूंच्या ६६ घरांचे नुकसान केले असून, किमान २० घरे पेटवून दिली आहेत. शंभरहून अधिक लोकांच्या जमावाने जाळपोळ करण्याची ही घटना रंगपूर जिल्ह्याच्या पीरगंज उपजिल्ह्यातील एका खेड्यात रविवारी उशिरा घडली. या प्रकरणी ५२ संशयितांना अटक करण्यात आली आहे.