वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

पाकिस्तान हा काश्मीरसह भारताला लक्ष्य करणाऱ्या दहशतवादी संघटनांसाठी कार्यरत असणारा तळ आहे. यापैकी काही संघटना १९८०च्या दशकापासून सक्रिय आहे. अमेरिका काँग्रेसच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

अहवालात नमूद केलेल्या १५ पैकी १२ संघटनांना अमेरिकेच्या कायद्यानुसार परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे. २००३पासून पाकिस्तानला देशांतर्गत दहशतवादाचा मोठा फटका बसला असून २००९ मध्ये मृत्यूंचा आकडा सर्वाधिक होता. २०१९ मध्ये दहशतवादाशी संबंधित मृत्यूंची संख्या ३६५पर्यंत खाली आली होती, मात्र त्यानंतर ती दरवर्षी वाढत असून २०२५मध्ये हा आकडा ४ हजारावर पोहोचला आहे. गेल्या ११ वर्षातला हा सर्वात मोठा आकडा आहे. यातील बहुतेक मृत्यू हे खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान या दोन प्रांतांमध्ये, विशेषतः अफगाणिस्तान सीमेजवळ झाले आहेत.

पाकिस्तानने २०१४ मध्ये दहशतवादविरोधी राष्ट्रीय कृती आराखडा स्वीकारला. तसेच २०१८ मध्ये आर्थिक कृती दलाने पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकले होते. मात्र २०२२ मध्ये आवश्यक सुधारणा पूर्ण केल्यानंतर पाकिस्तानला या यादीतून वगळण्यात आले. एकूणच पाकिस्तान सध्या दहशतवादामुळे सर्वाधिक प्रभावित देशांपैकी एक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.