भारताच्या राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना पूर्णपणे राजनैतिक संरक्षण असल्याचा निकाल देत त्यांनी व्हिसाचा गैरवापरर केल्याचा आरोप अमेरिकेच्या न्यायालयाने फेटाळून लावला. मात्र, पुढील काळात त्यांच्याविरोधात नव्याने आरोप ठेवण्याची मुभा न्यायालयाने फिर्यादी पक्षास दिली आहे.
जिल्हा न्यायाधीश शायरा शिण्डेलीन यांनी यासंबंधात निकाल दिला. खोब्रागडे यांची संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्या विशेष दूत म्हणून नियुक्ती करण्याच्या प्रस्तावास  ८ जानेवारी रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने मान्यता दिली, त्याच वेळी खोब्रागडे यांना पूर्णपणे राजनैतिक संरक्षण प्राप्त झाल्याचे स्पष्ट झाले आणि यात कोणताही संदेह नाही, असे न्यायालयाने नमूद केले. खोब्रागडे यांनी ९ जानेवारी रोजी सायंकाळी भारतास प्रयाण केले, तोपर्यंत त्यांना ते संरक्षण होते आणि त्यामुळे फिर्यादींना त्यांच्याविरोधात अफरातफरीचा खटला लागू करता येणार नाही, असेही न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले.
व्हिसाचा गैरवापर आणि खोब्रागडे यांच्या मदतनीस संगीता रिचर्ड यांच्या व्हिसा अर्जात असत्य विधाने करण्यासंबंधी गेल्या १२ डिसेंबर रोजी ठेवण्यात आलेल्या आरोपपत्राप्रकरणी खोब्रागडे यांना मोकळे राहता येणार नाही. त्यांना अटक करण्यात आली, त्या वेळी राजनैतिक संरक्षण नव्हते, असा दावा अमेरिकेचे अ‍ॅटर्नी प्रीत भरारा यांच्या कार्यालयाच्या वतीने करण्यात आला होता.
आताही खोब्रागडे यांच्याविरोधात नव्याने खटला दाखल करण्यास न्यायालयाने आपल्यावर प्रतिबंध घातलेला नाही. खोब्रागडे या आता भारतात परतल्यामुळे त्यांना राजनैतिक संरक्षणही राहिलेले नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात आता पुन्हा खटला दाखल करण्याचा निर्णय भरारा यांच्या वतीने जाहीर करण्यात आला.