US Army Chief : गेल्या एका महिन्यांपासून अमेरिका-इराण युद्ध सुरू आहे. या युद्धात इराणचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र, त्यानंतर अद्यापही हे युद्ध पूर्णपणे थांबलेलं नाही. २८ फेब्रुवारीपासून पश्चिम आशियात पेटलेल्या या युद्धाची धग अद्यापही धुमसत असून याचा जागतिक बाजारपेठेवर परिणाम होत आहे. अनेक देशांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. यातच अमेरिका-इराण युद्ध थांबवण्यासाठी हालचाली सुरू असल्या तरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी राष्ट्राला उद्देशून केलेल्या १८ मिनिटांच्या भाषणानंतर युद्ध थांबणार की आणखी भडकणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

यातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. इराणबरोबर युद्ध चालू असतानाच अमेरिकेने लष्करप्रमुखांना तडकाफडकी हटवलं असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी शुक्रवारी अमेरिकेचे लष्करप्रमुख जनरल रँडी जॉर्ज यांना तात्काळ सक्तीची निवृत्ती घेण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भातील वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.

अमेरिकेचे लष्करप्रमुख जनरल रँडी जॉर्ज यांच्यासह आणखी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही बडतर्फ केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी अमेरिकेचे लष्करप्रमुख रँडी जॉर्ज यांना तात्काळ सक्तीची निवृत्ती घेण्याचे आदेश का दिले? नेमकं काय घडलं? याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

वृत्तानुसार, जनरल जॉर्ज यांनी अद्याप अधिकृत राजीनामा दिलेला नाही. मात्र, संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी आदेश दिल्यामुळे ते राजीनामा देऊन निवृत्तीची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. रँडी जॉर्ज यांनी याआधी इराक, अफगाणिस्तान युद्धादरम्यान सेवा बजावलेली आहे. २०२३ मध्ये त्यांची लष्कराच्या सर्वोच्च पदावर नियुक्ती झाली होती.

इराण युद्धाबाबत अद्यापही साशंकता

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धाची ठिगणी पडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाचे विधान केले होते. इराणबरोबरचा आमचा संघर्ष चार ते पाच आठवडे सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. यादरम्यान युद्धाला पाच आठवडे पूर्ण होण्यास अवघ्या दोन दिवसांचा अवधी उरला आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटलं की, अमेरिकेची लष्करी उद्दिष्टे लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. पुढील दोन ते तीन आठवड्यांत अमेरिकेकडून इराणवर आणखीनच तीव्र हल्ले केले जातील. त्यांच्या या विधानामुळे पश्चिम आशियात भडकलेले युद्ध सुमारे आठ आठवड्यांपर्यंत चालू राहण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ इराण आणि संपूर्ण जगाला एका दीर्घकालीन संघर्षासाठी तयार राहावे लागणार आहे. युद्धाची ठिणगी पडल्यानंतर हा संघर्ष दीर्घकाळ चालणार, अशी अपेक्षा कोणीही केली नव्हती. सध्याच्या युद्धाचा कालावधी किती कमी आहे हे पटवून देण्यासाठी ट्रम्प यांनी अमेरिकेने भूतकाळात लढलेल्या मोठ्या युद्धांचा दाखला दिला. त्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीची या युद्धाशी तुलना केली.