वॉशिंग्टन : युरोपीय महासंघाचे (ईयू) सदस्य असलेल्या देशांमध्ये उत्पादन होणाऱ्या कार आणि ट्रकवर पुढील आठवड्यापासून २५ टक्के आयातशुल्क लावले जाईल, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी केली. ‘ईयू’ व्यापार कराराचे पूर्ण पालन करत नसल्याचा आरोप ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये केला. मात्र, आपले नेमके काय आक्षेप आहेत, ते त्यांनी नमूद केले नाहीत.
आधीच पश्चिम आशियातील युद्धामुळे संकटात असलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेला ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे आणखी फटका बसण्याची भीती आहे. ट्रम्प यांनी विविध देशांवर आकारलेल्या आयातशुल्कांच्या विरोधात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर त्यांनी सर्व देशांवर सरसकट १० टक्के आयातशुल्क लागू केले आहे. त्यातही आता वाढ करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याची टीका होण्याची शक्यता आहे.
