अमेरिकेत जाण्यासाठी कथित बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करणारे गुजरातमधील तीन नातेवाईक इथिओपियामध्ये बेपत्ता झाले आहेत. त्यांचे अपहरण झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला असून, तिघांना सुरक्षित परत आणण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, तिघेही २० सप्टेंबर रोजी एजंटच्या माध्यमातून अमेरिकेला जाण्यासाठी घरातून निघाले होते. मात्र, २२ सप्टेंबरनंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. याबद्दल सविस्तर वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले आहे.
कोण आहेत बेपत्ता झालेले तिघे?
या बेपत्ता झालेल्या तीनही व्यक्तींची प्रशासनाकडून ओळख जाहीर करण्यात आली आहे. यात मेहसाणातील वडसमा गावातील रहिवासी ऋत्विक जंसारी, मूळ मेहसाणाच्या व सध्या अहमदाबादमध्ये राहणाऱ्या ममता छावडा आणि गांधीनगरची रहिवासी असलेल्या मयुरी यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, हे तिघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रत्येकी ७० लाख रुपये एजंटला दिल्याचा दावा
ममताचे वडील किरीटभाई चौहान यांनी कुटुंबाने तिघांना अमेरिकेत पाठवण्यासाठी प्रत्येकी सुमारे ७० लाख रुपये एजंटला दिल्याचा दावा केला आहे. चौहान यांच्या म्हणण्यानुसार, इथिओपियात पोहोचल्यानंतर तिघांना कथितरित्या ओलीस ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी १ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे.
“आम्ही त्यांना अमेरिकेत पाठवण्यासाठी आधीच खूप पैसे दिले आहेत. आता आमच्याकडे काहीही शिल्लक राहिलेले नाही. सरकारने आमच्या तिन्ही मुलांना सुरक्षित परत आणावे,” असे चौहान यांनी म्हटल्याचे वृत्तसंस्था पीटीआयने वृत्त दिले आहे.
‘आधीच ६० लाख रुपये दिले’
ऋत्विकचे आजोबा कनुभाई जंसारी यांनीही अपहरणकर्त्यांनी १ कोटी रुपयांची मागणी केल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबाने आतापर्यंत ६० लाख रुपये दिले आहेत. स्थानिक एजंट अल्पेश पांचाल यांनीही अपहरणकर्त्यांकडून १ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी झाल्याचे सांगितले आहे. मात्र, तिघांचे प्रत्यक्ष अपहरण झाले आहे की नाही आणि खंडणीची मागणी नेमकी कोणी केली, याबाबत अधिकृत तपासातून अद्याप स्पष्टता आलेली नाही.
एजंटमार्फत प्रवासाची व्यवस्था?
नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, तिघांनी मेहसाणा जिल्ह्यातील एका एजंटच्या माध्यमातून अमेरिकेच्या प्रवासाची व्यवस्था केली होती. या एजंटने त्यांचा संपर्क वडोदऱ्यातील आणखी एका एजंटशी करून दिल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी तिघेही बेपत्ता असल्याची नोंद केली असून २२ सप्टेंबरनंतर त्यांचा ठावठिकाणा लागलेला नसल्याचे सांगितले आहे.
ममताच्या पतीने सहा महिन्यांपूर्वी अमेरिकेत प्रवेश केला
मेहसाणा जिल्ह्यातील लंघणज पोलीस ठाण्याचे निरीक्षक ए. एम. गेहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ममताचे वडील किरीटभाई यांनी मंगळवारी बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, ममताचे पती चिराग कुमार सुमारे सहा महिन्यांपूर्वी विद्यार्थी व्हिसावर अमेरिकेत गेले होते. ममतानेही अमेरिकेचा व्हिसा मिळवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले, मात्र तिला यश आले नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी मध्यस्थांशी संपर्क साधून बेकायदेशीर मार्गाने तिला अमेरिकेत पाठवण्याची व्यवस्था केल्याचे पोलिसांनी सांगितले.
२० सप्टेंबर रोजी ममता, ऋत्विक आणि मयुरी घरातून निघाले. २२ सप्टेंबर रोजी किरीटभाई यांचे ममताशी शेवटचे बोलणे झाले. त्यानंतर तिघांशीही संपर्क होऊ शकला नाही. कुटुंबीयांनी शोध घेऊनही माहिती न मिळाल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. सध्या पोलिसांकडून तिघांचा ठावठिकाणा आणि त्यांच्या प्रवासाच्या मार्गाबाबत तपास सुरू आहे.
