तेव्हा ‘मुंबईकर बायडेन’ यांचं पत्र आलं…; जो यांचं मुंबईशी आहे खासं नातं

जो बायडेन यांनी यासंदर्भात केलेला खुलासा

(फोटो सौजन्य: एपी आणि रॉयटर्स)

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीमध्ये सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव जवळजवळ निश्चित आहे. सध्या सुरु असणाऱ्या मतमोजणीमध्ये डेमोक्रेट पक्षाचे उमेदवार जो बायडेन हे बहुमतापासून अवघी काही मतं दूर आहेत. त्यामुळेच बायडेनच अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष होणार असून यावर औपचारिक शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. बायडेन हे अमेरिकेतील सर्वात ज्येष्ठ राजकारण्यांपैकी आहेत. त्यांनी १९७२ साली पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. याच निवडणुकीमध्ये विजय मिळवत सिनेटर म्हणून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा श्री गणेशा केला होता. मात्र बायडेन यांचं भारताबरोबर आणि त्यातही मुंबईबरोबर एक खास नातं आहे. यासंदर्भात स्वत: बायडेन यांनीच खुलासा केला होता.

डेमोक्रेटिकचे उमेदवार असणारे बायडेन हे २०१३ रोजी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी मुंबईमध्ये दिलेल्या एका भाषणामध्ये आपले भारताबरोबरचे खास नाते असल्याचे म्हटले होतं. बायडेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते १९७२ साली पहिल्यांदा निवडणूक जिंकले तेव्हा त्यांना मुंबईमधील एका बायडेन कुटुंबाने पत्र पाठवलं होतं. यापत्रामध्ये मुंबईकर बायडेन कुटुंबाने आपल्या दोन्ही कुटुंबांचे पूर्वज एकच असल्याचा उल्लेख केला होता. बायडेन कुटुंबाचे पूर्वज १८ व्या शतकामध्ये इस्ट इंडिया कंपनीमध्ये काम करायचे असंही या पत्रामध्ये म्हटलं होतं. मात्र पुढे या पत्रावरुन आपण त्या कुटुंबाशी फारसा संवाद साधू शकलो नाही आणि याबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळवता आली नाही असं सांगत जो बायडेन यांनी खेदही व्यक्त केला होता.

आणखी वाचा- “…अन् उडी मारुन सारं काही संपवावं”; बायडेन यांनी केलेला आत्महत्येचा विचार

अमेरिकेतील वॉशिंग्टनमधील एका इंडो-युएस फोरमच्या बैठकीमध्येही त्यांनी आपल्या भारताबरोबरच्या संबंधांचा उल्लेख केला होता. आमच्या एका पूर्वजाने भारतीय महिलेशी लग्न केलं असावं आणि आजही माझ्या कुटुंबाशी संबंध असणारे काही लोकं भारतात असतील असं बायडेन म्हणाले होते. त्यावेळी त्यांनी आपल्याला एका पत्रकाराने मुंबईत बायडेन अडनाव असलेले पाच लोकं आहेत अशी माहिती दिल्याचेही सांगितले होते. आपल्या भारताबद्दलच्या कनेक्शनसंदर्भात बोलताना त्यांनी मस्करीमध्ये, भविष्यात मी भारतातूनही निवडणूक लढवू शकतो असंही म्हटलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Us election result 2020 do you know mumbai and indian connection of joe biden scsg