अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाची दुसरी निवडणूक जिंकण्यात अपयशी ठरलेत, तर अशी कामगिरी करणारे ते अमेरिकेच्या इतिहासातील पहिले राष्ट्राध्यक्ष नाहीत. पण मागच्या तीस वर्षातील फेर निवडणूक जिंकू न शकलेले ते पहिले राष्ट्राध्यक्ष ठरतील. १९९२ साली रिपब्लिकन उमेदवार जॉर्ज डब्ल्यू बुश दुसरी टर्म जिंकण्यात अपयशी ठरले होते. डेमोक्रॅटिक पक्षाच्या बिल क्लिंटन यांनी त्यांचा पराभव केला होता. जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्यानंतर बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू बुश (ज्यूनिअर) आणि बराक ओबामा यांनी सलग दोन टर्म अमेरिकन राष्ट्राध्यक्षपद भूषवले आहे, अपवाद ठरतील ते फक्त डोनाल्ड ट्रम्प

जॉर्ज डब्ल्यू बुश
१९९२ सालच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत अमेरिकेतील रिपब्लिकन्सची दीर्घकाळापासूनची सत्ता संपुष्टात आली. त्या निवडणुकीत जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या विजयाचे भाकीत वर्तवण्यात आले होते. पण बिल क्लिंटन यांना ४३ टक्के पॉप्युलर व्होट आणि ३७० इलेक्टोरल कॉलेज व्होटस मिळाली. बुश यांना फक्त ३७.३ टक्के पॉप्युलर व्होटस आणि १६८ इलेक्टोरल व्होटस मिळाले.

जिमी कार्टर

तत्कालिन राष्ट्राध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जिमी कार्टर यांचा रिपब्लिकन पक्षाच्या रोनाल्ड रेगन यांनी पराभव केला. रेगन यांनी मोठया मताधिक्क्याने विजय संपादन केला. त्यांना ५०.७ टक्के पॉप्युलर व्होट मिळाले.

जेराल्ड फोर्ड
१९७६ साली रिपब्लिकन उमेदवार आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्ड यांचा डेमोक्रॅटिक उमेदवार जिमी कार्टर यांनी पराभव केला. प्रेसिडंट रिचर्ड निक्सन यांनी १९७४ साली वॉटर गेट प्रकरणात राजीनामा दिला तेव्हा जेराल्ड फोर्ड उपराष्ट्राध्यक्ष होते. रिचर्ड निक्सन यांच्या राजीनाम्यामुळे त्यांना थेट राष्ट्राध्यक्ष बनण्यात आले. जेराल्ड फोर्ड हे पहिले असे राष्ट्राध्यक्ष आहेत, जे इलेक्टोरल कॉलेजने निवडून न येता थेट राष्ट्राध्यक्ष बनले.

हर्बर्ट हूवर
१९३२ च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन उमेदवार हर्बर्ट हूवर यांचा डेमोक्रॅटिक उमेदवार फ्रँकलीन डी रुझवेल्ट यांनी पराभव केला होता. त्यावर्षी मोठी मंदी होती. त्या पार्श्वभूमीवर रुझवेल्ट यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर मोठा विजय मिळवला होता.