Donald Trump NATO Exit news update following the US Iran War and lack of support from European allies : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाने आता दुसऱ्या महिन्यात प्रवेश केला आहे. या संघर्षाच्या कालावधीत अनेक घडामोडी घडून गेल्या आहेत. हे युद्ध दीर्घकाळ लांबल्याचे गंभीर परिणाम सध्या जगभरात दुसून येत आहेत. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘नाटो’बाबत एक अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे.
अमेरिकेच्या मध्यपूर्वेतील मोहिमेला पाठिंबा देण्याबाबत युरोपीय मित्रराष्ट्रांकडून नकार मिळाल्यानंतर, ट्रम्प हे एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या विचारात आहेत. या निर्णयाचे परिणाम फक्त अमेरिका-युरोप संबंधांपुरते मर्यादित नसून ते जागतिक स्तरावर उमटू शकतात. एका मुलाखतीत नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘नाटो’मधून बाहेर पडण्याची शक्यता बोलून दाखवली आहे. विशेष बाब म्हणजे, अमेरिकेनेच एक संस्थापक सदस्य देश म्हणून ‘नाटो’ या संघटनेची स्थापना केली होती.
टेलिग्राफला दिलेल्या एका मुलाखतीत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी याबद्दलचे विधान केले आहे. इराणिवरोधातील युद्धात ‘नाटो’ सहभागी न झाल्याने आपण या लष्करी संघटनेतून अमेरिकेला बाहेर काढण्याचा गांभीर्याने विचार करत आहेत, असे ट्रम्प म्हणाले आहेत.
यापूर्वीही ट्रम्प यांनी नाटो देशांबद्दल आपला संताप व्यक्त केला आहे. मात्र आता ट्रम्प यांनी या संघटनेतून बाहेर पडण्याबाबत थेट वक्तव्य केले आहे. नाटो राष्ट्रांनी इराणविरोधात मदत म्हणून काहीही केले नाही आणि आपल्याला नाटोकडून कसल्याही मदतीची गरज नाही, असेही ट्रम्प म्हणाले. तसेच नाटो देशांची ही युती एक ‘कागदी वाघ’ (Paper tiger) असल्याचे टीकाही ट्रम्प यांनी यावेळी केली. याबरोबरच या करारातून बाहेर पडण्याचा निर्णय आता पुनर्विचाराच्या पलीकडचा असल्याचेही ते म्हणाले.
इराण युद्धानंतर अमेरिका नाटोच्या सदस्यत्वाबाबत पुनर्विचार करणार का? असा प्रश्न ट्रम्प यांना विचारण्यात आला. यावर बोलताना ट्रम्प म्हणाले, “हो नक्कीच, मी म्हणेन की हे आता पुनर्विचाच्या पलीकडे गेले आहे. मी कधीही नाटोच्या प्रभावाखाली नव्हतो. मला नेहमीच माहिती होते की ते कागदी वाघ आहेत, आणि खरे सांगायचे झाल्यास, पुतिन यांनाही हे माहित आहे.”
ट्रम्प ‘नाटो’वर नाराज का आहेत?
ट्रम्प यांचा नाटो देशांवरील नाराजी ही गेल्या काही वर्षांपासूनची आहे. मात्र २८ फेब्रुवारी रोजी जेव्हा अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणविरोधात मोहिम सुरू केली तेव्हा पाश्चिमात्य मित्र राष्ट्रांकडून ट्रम्प यांना पाठिंबा मिळाला नाही. यामुळे ट्रम्प यांच्या नाराजीमध्ये आणखीच भर पडली. ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराणने केलेले नाकेबंदी मोडून काढण्याासठी युरोपीय देशांना त्यांच्या युद्धनौकांना तैनात करण्याचे आवाहन केले होते. तेव्हा एकाही देशाने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.
मध्यपूर्वेतील युद्धादरम्यान स्वित्झर्लंडने इराणविरुद्ध लढणाऱ्या अमेरिकन विमानाना आपली हवाई क्षेत्र वापरू देण्यास नकार दिला आहे. स्पेनने देखील अमेरिकेने इराणमध्ये पुकारलेल्या युद्धावर टीका केली आहे. तसेच इटलीने देखील अमेरिकन विमानांना सिसिलीमधील तळांच्या वापराची परवानगी नाकारली आहे.
फ्रान्सने रिफ्युलिंग सारख्या कामांसाठी आपल्या तळांचा वापर करण्यास परवानगी दिली आहे, पण हल्ले करण्याशी संबंधित ऑपरेशन्सना परवानगी देण्यास नकार दिला आहे.
