अमेरिका आणि इराण यांच्यात सध्या जोरदार संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, सोमवारी (२ मार्च) कुवेतमध्ये अमेरिकन हवाई दलाचे एफ-१५ई ‘स्ट्राइक ईगल’ (F-15E Strike Eagle) हे लढाऊ विमान कोसळल्याचे सांगितले जात आहे. याबाबत अनेक मीडिया रिपोर्ट्स आणि सोशल मीडिया पोस्ट समोर येत आहेत. इराणने मध्यपूर्वेतील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरू ठेवल्याचेही सांगितले जात आहे. तसेच मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे विमान कोसळत असताना वैमानिक सुखरूप बाहेर पडला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, स्ट्राइक ईगल विमानातून धुराचे लोट निघताना दिसत आहेत. विमान नियंत्रण गमावलेल्या स्थितीत खाली कोसळताना दिसत आहे. इतर काही फोटोंमध्ये, विमानातून बाहेर पडलेल्या वैमानिकाला कुवेतमधील लष्करी जवान घेऊन जाताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये वैमानिकाला एका वाहनातून नेले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, अमेरिका किंवा कुवेत प्रशासनाकडून वैमानिकाच्या स्थितीबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.

कोसळलेल्या विमानाचे अवशेष कुवेत इंटिग्रेटेड पेट्रोलियम इंडस्ट्रीज कंपनी (KIPIC) द्वारे संचालित ‘मीना अल अहमदी रिफायनरी’मध्ये पडले, ज्यामुळे दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. आपत्कालीन पथके त्वरित घटनास्थळी दाखल झाली. ही रिफायनरी कुवेत शहराच्या दक्षिणेस किनारपट्टीवर आहे.

विमान कोसळण्याचे कारण काय असावे?

अमेरिकन लढाऊ विमान कोसळण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र प्राथमिक अहवालामध्ये एक वेगळीच शक्यता वर्तवली जात आहे. कुवेतच्या हवाई क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘पॅट्रियट एअर डिफेन्स बॅटरी’कडून हे एफ-१५ विमान चुकून पाडले गेले असावे, असे सांगितले जात आहे.

पॅट्रियट सिस्टम हे अमेरिकन बनावटीचे एक असा प्लॅटफॉर्म आहे जो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि शत्रूची विमाने रोखण्यासाठी तयार करण्यात आला आहे. सध्या इराणकडून विविध देशांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले केले जात आहेत, या दरम्यान या सिस्टमकडून अमेरिकन विमान पाडले गेले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये कथितपणे एफ-१५ विमान जमिनीवर कोसळताना आणि त्यानंतर आगीचे लोट उसळताना दिसत आहे. या व्हिडीओ फुटेजच्या सत्यतेबाबत अद्याप स्पष्टता मिळू शकलेली नाही. कुवेत किंवा अमेरिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अद्याप याची पुष्टी केलेली नाही.

अमेरिका-इराण संघर्षाचे तीन दिवस

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तसेच इराणचे जवळपास ४० वरिष्ठ लष्करी अधिकारी देखील ठार झाले आहेत. त्यानंतर इराणने युएई, बहरीन आणि कतार येथील अमेरिकेच्या हवाई तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागल्याचे पाहायला मिळाले.

कुवेतमध्ये अमेरिकेचे मोठे लष्करी तळ आहेत आणि हा भाग दीर्घकाळापासून अमेरिकेसाठी लॉजिस्टिक हब राहिला आहे. त्यामुळे या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने कुवेतमधील तळांना लक्ष्य केले असावे, असा अंदाज आहे. दरम्यान, विमान कोसळल्याच्या या घटनेवर अद्याप अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.