Nitya Raman Los Angeles Mayor Election: अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉस एंजेलिसच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या नगरसेविका नित्या रामन यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यांनी विद्यमान महापौर कॅरेन बास यांचा पराभव करत सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का दिला.

२०२० मध्ये पहिल्यांदा लॉस एंजेलिस नगरपरिषदेवर निवडून गेलेल्या नित्या रामन यांनी चालू वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात महापौरपदाच्या शर्यतीत उतरण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे, निवडणूक रिंगणात उतरण्याच्या अवघ्या काही आठवड्यांपूर्वीच त्यांनी बास यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी जाहीर पाठिंबा दर्शवला होता. मात्र त्यानंतर ही लढत दोन वेगवेगळ्या राजकीय विचारसरणी आणि पिढ्यांमधील प्रतिष्ठेचा संघर्ष ठरली. सार्वजनिक सुरक्षितता, परवडणारी घरे आणि शहरातील बेघरांची समस्या या प्रमुख मुद्द्यांवर दोन्ही उमेदवारांनी परस्परविरोधी भूमिका घेतल्या होत्या.

या निवडणुकीत कॅरेन बास यांना शहरातील प्रस्थापित राजकीय वर्तुळ, ‘लॉस एंजेलिस काउंटी फेडरेशन ऑफ लेबर’ आणि स्थानिक डेमोक्रॅटिक पक्षाचा भक्कम पाठिंबा लाभला होता. याउलट, नित्या रामन यांच्या मागे गेल्या काही वर्षांत महापालिकेत प्रभाव वाढवणाऱ्या ‘डेमोक्रॅटिक सोशालिस्ट्स ऑफ अमेरिका’सारख्या डाव्या विचारसरणीच्या संघटना आणि वाहतूक सुधारणांसाठी आग्रही असणाऱ्या ‘स्ट्रीट्स फॉर ऑल’ या नागरी गटांची मोठी ताकद उभी राहिली.

प्रचाराची हटके शैली

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात दोन्ही उमेदवारांच्या प्रचार रणनीतीतील फरक प्रकर्षाने जाणवला होता. बास यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मतदारांवर भर दिला; त्यांनी वेस्ट अ‍ॅडम्स आणि नॉर्थरिज येथील ज्येष्ठ नागरिक केंद्रांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला. तर नित्या रामन यांनी महाविद्यालये, बार आणि पब्समध्ये जाऊन थेट तरुण पिढीला साद घालत स्थानिक प्रशासनात आमूलाग्र बदलाची हाक दिली.

माजी काँग्रेस सदस्य आणि कॅलिफोर्निया राज्य विधिमंडळाच्या ज्येष्ठ नेत्या असलेल्या कॅरेन बास यांना २ जून रोजी झालेल्या प्राथमिक निवडणुकीत अवघी ३४ टक्के मते मिळाली होती, जी एका विद्यमान महापौरासाठी चिंतेची बाब मानली जात होती. २०२५ मधील ‘पॅलिसॅड्स वणव्या’च्या काळात त्या एका परदेशी दौऱ्यावर होत्या. या घटनेनंतर त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख घसरला होता.

प्रचारकाळात बास यांनी गुन्हेगारी नियंत्रण, परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांना गती देणे आणि रस्त्यांवरील बेघरांच्या संख्येत ११ टक्क्यांची घट केल्याचा दावा केला. मात्र, नित्या रामन यांनी बास यांच्या धोरणांवर ताशेरे ओढत त्या उपाययोजना अत्यंत महागड्या आणि निष्फळ ठरल्याची टीका केली. रामन यांनी स्वतःच्या हॉलिवूड हिल्स प्रभागातील बेघरांच्या छावण्या कमी करण्याचे यशस्वी उदाहरण देत, २०२८ च्या उन्हाळ्यापर्यंत शहरातील उघड्यावरील बेघरांची संख्या निम्म्यावर आणण्याचे आणि पहिल्या चार वर्षांच्या कार्यकाळात ती पूर्णपणे संपवण्याचे आश्वासन दिले.

कोण आहेत नित्या रामन?

नित्या रामन यांचा जन्म १९८१ मध्ये केरळमध्ये झाला. वयाच्या सहाव्या वर्षी त्या कुटुंबासह अमेरिकेत गेल्या आणि २२ व्या वर्षी त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले, तर मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथून नगररचना (अर्बन प्लॅनिंग) या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

सक्रिय राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी भारतात ‘ट्रान्सपरंट चेन्नई’ ही नागरी संस्था स्थापन करून स्वच्छता आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर काम केले होते. २०१३ मध्ये लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक झाल्यानंतर त्यांनी महापालिकेच्या प्रशासकीय कार्यालयात काम केले, ‘सेलाह नेबरहूड होमलेस कोलिशन’ची पायाभरणी केली आणि ‘टाइम अप एंटरटेनमेंट’च्या कार्यकारी संचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळली.