पाकिस्तानातील ३ खतरनाक दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळायला अमेरिकेने सुरुवात केली आहे. यातील पहिले पाऊल म्हणजे या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यास एकूण ३.५५ कोटींचे बक्षीस अमेरिकेतील एका राज्याच्या सरकारने जाहीर केले आहे.


या राज्याने केलेल्या आवाहनानुसार, टीटीपी प्रमुख मौलाना फजलुल्लाह, जमात-उल-अहरारचा दहशतवादी अब्दुल वली आणि लष्कर-ए-इस्लामचा दहशतवादी मंगल बाग या तीन दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला तीन लाख डॉलरचे बक्षीस दिले जाणार आहे. हे तीनही दहशतवादी अमेरिकेमध्ये मोस्ट वॉन्टेड आहेत.

अमेरिकेने टीटीपीला १ सप्टेंबर २०१० रोजी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते. फजलुल्लाह आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेने पेशावरच्या सैनिकी शाळेवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती. यामध्ये १३४ मुलांसह १४८ लोकांचा मृत्यू झाला होता.

फजलुल्लाहने २०१२ मध्ये पाकिस्तानातील मुलींच्या शिक्षणाबाबत आवाज उठवणाऱ्या नोबेल पारितोषिक विजेत्या पाकिस्तानी विद्यार्थीनी मलाला युसुफझाईच्या हत्येचा प्रयत्नही केला होता. फजलुल्लाहला नोव्हेंबर २०१३मध्ये तालिबानचा नेता म्हणून निवड करण्यात आली होती. टीटीपीचा नेता बनण्याआधी फजलुल्लाहने सप्टेंबर २०१३मध्ये पाकिस्तानी सैन्यातील मेजर एस. नियाजी यांची हत्या केली होती.