इराणबरोबर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताला रशियाकडून तेलखरेदी करण्यासाठी ३० दिवसांची सूट दिली आहे. अमेरिकेच्या या निर्णयाला सत्ताधारी भाजपने मोदी सरकारच्या तेलनीतीचे यश मानले आहे, तर राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या तडजोडीच्या भूमिकेमुळे मुत्सद्दीपणाचे अवकाश आपण गमावले असल्याची टीका केली. भारताला ४ एप्रिलपर्यंत रशियाकडून तेलखरेदी करता येणार आहे.

अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट म्हणाले, ‘अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या ऊर्जा क्षेत्रातील धोरणामुळे तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. जागतिक बाजारपेठेत तेलाचा पुरवठा खेळता राहावा, यासाठी भारतातील तेलकंपन्यांना रशियातून तेलखरेदी करण्यासाठी ३० दिवसांची सूट देण्यात येत आहे. या महिनाभराच्या सवलतीमुळे रशियाचा फार मोठा फायदा होणार नाही. कारण समुद्रामध्ये अडकून पडलेल्या तेलाच्या खरेदीचाच या व्यवहारामध्ये समावेश आहे. भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार आहे. भारत अमेरिकेकडून तेलखरेदी वाढवेल, अशी अपेक्षा आहे. जागतिक ऊर्जाक्षेत्र आपल्याच प्रभावाखाली असल्याच्या इराणच्या प्रयत्नांना त्यामुळे यश येणार नाही.’

रशियातील ऊर्जा उत्पादनांच्या मागणीत वाढ

मॉस्को : ‘इराणमधील युद्धामुळे रशियातील ऊर्जा उत्पादनांना मागणी वाढली आहे,’ अशी माहिती रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह यांनी दिली. ते म्हणाले,‘रशिया तेल आणि गॅसपुरवठा करणारा विश्वासार्ह देश आहे. ज्यांच्याबरोबर कंत्राटे करण्यात आली आहेत, त्यांना पुरवठा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’ भारताला रशिया नेमका किती तेलपुरवठा करणार आहे, हे सांगण्यास मात्र नकार दिला.

 
भारताचे परराष्ट्र धोरण जनतेच्या सामूहिक इच्छाशक्तीवर उभारले आहे. आपल्या इतिहासात, भूगोलात त्याची पाळेमुळे आहेत. आज आपण जे काही अनुभवत आहोत, ते कुठल्याही प्रकारचे धोरण नसून, तडजोडीची भूमिका घेतलेल्या व्यक्तीमुळे झालेला परिणाम आहे. – राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, काँग्रेस

अमेरिकेने ३० दिवसांसाठी दिलेली ही ‘परवानगी’ जगामध्ये मुत्सद्दीपणाचे अवकाश आपण गमावत आहोत, हे दाखवून देते. ही अशा प्रकारची भाषा निर्बंध घातलेल्या देशांसाठी वापरली जाते. भारतासाठी नाही. ही पूर्ण शरणागती आहे. – मल्लिकार्जुन खर्गे, अध्यक्ष काँग्रेस
 
अमेरिकेने ३० दिवसांची रशियाकडून तेलखरेदी करण्यास दिलेली मुभा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तेलमुत्सद्देगिरीचे यश आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसला दिलेली ही चपराक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सामरिक संयम आणि सामरिक स्पष्टता ठेवून कृती करीत असल्याचे राहुल गांधी आणि काँग्रेसला पाहावत नाही, ते द्वेष करतात. – प्रदीप भंडारी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते
 

‘गॅसपुरवठ्यासाठी रशियाकडे पाहणे चुकीचे’

ब्रसेल्स : ‘जागतिक तेलबाजारात द्रवीभूत नैसर्गिक वायूचा (एलएनजी) पुरवठा पाहता रशियाकडे त्यासाठी पाहणे आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या चूक ठरेल,’ असे वक्तव्य ‘आंतरराष्ट्रीय ऊर्जा आयोगा’चे (आयईए) कार्यकारी संचालक फातिह बिरोल यांनी केले. युरोपीय कमिशनचे अध्यक्ष वॉन दर लियेन आणि युरोपीय संघाच्या इतर पदाधिकार्‍यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर बिरोल म्हणाले, ‘पश्चिम आशियातील अस्थिरतेमुळे पुन्हा रशियाकडे गॅसपुरठ्यासाठी वळावे का, असा प्रश्न काहींना पडला आहे. ऊर्जाक्षेत्रासाठी केवळ एकाच देशावर, रशियावर सर्वाधिक ठेवलेले अवलंबित्व ही युरोपची ऐतिहासिक चूक आहे.’

लांबलेल्या युद्धाचा हापूसला घोर

नवी मुंबई : हवामानामुळे यंदा हापूस आंब्याचे उत्पादन घटण्याची शक्यता असतानाच कोकणातील आंबा उत्पादकांना पश्चिम आशियातील युद्धाची चिंता सतावत आहे. युद्धस्थिती न निवळल्यास आंबा उत्पादकांचे नुकसान होऊ शकते. – पान २

हळदीच्या दरात घसरण

सांगली : युद्धामुळे मुंर्बईतील जवाहरलाल नेहरू बंदरातून निर्यात बंद झाल्याने हळदीचे दरही प्रति क्विंटल २ हजार ३०० रुपयांनी उतरले आहेत. सांगली बाजारात गेल्या आठवड्यात हळदीला क्विंटलला सरासरी १८,३०० रुपये असलेला दर गुरुवारी १६ हजारापर्यंत उतरला आहे.