वृत्तसंस्था, वॉशिंग्टन / दुबई

अमेरिकेच्या ‘अपाचे गनशिप’ या लढाऊ हेलिकॉप्टरमधील क्रू सुरक्षित असून, अमेरिकी नौदलाच्या ड्रोनने त्यांची सुखरूप सुटका केली. होर्मुझ सामुद्रधुनीत हे हेलिकॉप्टर कोसळले होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली.

अमेरिकी लष्कराच्या मध्य कमांडनी सांगितले, की हेलिकॉप्टरमधील दोन क्रू सदस्य होर्मुझच्या सामुद्रधुनीत पडले होते. तेथून अमेरिकी नौदलाच्या ड्रोननी त्यांची सुटका केली. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर दोन तासांत त्यांची सुटका करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर आहे. हेलिकॉप्टर कोसळण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

इराण-इस्रायलने हल्ले थांबविले

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या आवाहनानंतर इराण आणि इस्रायलने परस्परांवरील हल्ले थांबविले आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या हवाई संरक्षण विभागातील दोघांचा मृत्यू झाला होता. इस्रायलने लेबनॉनवरील हल्ले सुरू ठेवल्यास पुन्हा हल्ले करण्याचा इशारा इराणने दिला आहे. दरम्यान, इराणबरोबर काही दिवसांतच करार केला जाईल, असे वक्तव्य अध्यक्ष ट्रम्प यांनी पुन्हा केले आहे.

तुम्ही एकटे पडाल : ट्रम्प यांचा नेतान्याहू यांना इशारा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्यात सोमवारी चर्चा झाल्याचे दोन्ही देशांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. इराणबरोबर युद्ध पुन्हा सुरू करू नका, असा इशारा इस्रायलला दिल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. ते नेतान्याहू यांना म्हणाले, ‘तुम्ही काळजीपूर्वक पावले टाका; अन्यथा तुम्ही लवकरच एकटे पडाल.’ लेबनॉनमधील संघर्ष थांबल्याशिवाय शांतता करार होणार नाही, अशी अट इराणने घातली आहे. इस्रायल मात्र सातत्याने लेबनॉनला लक्ष्य करीत असल्याने इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला होता.

कुवेतच्या आमीर यांच्याशी मोदींची चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कुवेतचे आमीर शेख मेशल अल अहमद अल जाबेर अल साबाह यांच्याशी फोनवरून संवाद साधला. पश्चिम आशियातील सुरक्षास्थितीबाबत दोघांच्यात संवाद झाला. या भागांत लवकर शांतता प्रस्थापित व्हावी आणि तणाव निवळावा यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला. कुवेतवर झालेल्या हल्ल्याचा या वेळी निषेध करण्यात आला.