एपी, ओक्लाहोमा सिटी

अमेरिकेत शुक्रवारपासून आलेल्या हिमवादळामुळे किमान १८ राज्यांनी आपत्कालीन स्थिती जाहीर केली असून देशभरात १० हजारांपेक्षा जास्त विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. शनिवारी सकाळी वीजपुरवठा खंडित झाल्याच्या ९५ हजारांपेक्षा जास्त घटना घडल्या. त्यापैकी एकट्या टेक्सास राज्यात ३६ हजार आणि व्हर्जिनियामध्ये १० हजार ठिकाणी विद्युत पुरवठा विस्कळीत झाला. हिमवादळामुळे तापमान उणे २४ अंश ते उणे ४० अंश सेल्सियसपर्यंत घसरले आहे.

अमेरिकेने गेल्या काही वर्षांमध्ये अनुभवलेले हे सर्वात तीव्रतेचे हिमवादळ असल्याचे स्थानिक सांगत आहेत. वादळाची दिशा दक्षिणेपासून वायव्येकडे आहे. यामध्ये आतापर्यंत किमान १४ कोटी (४० टक्के) नागरिकांना त्याची झळ बसली असून वादळ पुढे सरकेल त्याप्रमाणे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ‘नॅशनल वेदर सर्व्हिस’ने न्यू मेक्सिकोपासून न्यू इंग्लंडपर्यंतच्या भागात जोरदार बर्फवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. तसेच पूर्व टेक्सास ते नॉर्थ कॅरोलिना या भागात भयंकर बर्फवृष्टी होईल असा अंदाज आहे.