US House War Powers Resolution: इराणविरुद्ध सुरु असणाऱ्या युद्धाला आता डोनाल्ड ट्रम्प यांना स्वत:च्या पक्षातूनच विरोध होऊ लागला आहे. इराणविरुद्ध युद्ध थांबविण्यासाठीचा ठराव अमेरिकेच्या ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’मध्ये मंजूर करण्यात आला आहे. सभागृहात २१५ विरुद्ध २०८ मते ठरावाच्या बाजूने झाली आहेत. विशेष म्हणजे ट्रम्प यांच्या चार रिपब्लिकन सदस्यांनी डेमोक्रॅट्सच्या बाजूने मतदान केले आहे, असे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.

युद्धशक्ती ठराव मंजूर

‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’मधील ठरावानुसार, काँग्रेस युद्ध घोषित करत नाही किंवा लष्करी बळाच्या वापरास अधिकृत परवानगी देत ​​नाही, तोपर्यंत ट्रम्प यांना इराणमधून अमेरिकी सैन्य मागे घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. “युद्धशक्ती ठराव मंजूर होणे हा एक महत्त्वपूर्ण संकेत आहे. अधिकाधिक रिपब्लिकन नेते मतदारांचे म्हणणे ऐकत असून, त्यांना मध्यपूर्वेत आणखी एक युद्ध नको आहे,” असे युद्धशक्ती ठराव मांडणारे प्रतिनिधी ग्रेगरी मीक्स यांनी एका निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, रिपब्लिकन नेत्यांनी या ठरावाला दिलेला पाठिंबा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का मानला जात आहे.

‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’मध्ये झालेला ठराव महत्वाचा

युद्ध थांबविण्यासाठी मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला डेमोक्रॅट्सच्या सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला आहे. तर, सात सदस्य या प्रस्तावाच्या मतदानावेळी सभागृहात उपस्थित नव्हते. अमेरिकेने इस्रायलाशी हातमिळवणी करुन २८ फेब्रुवारीपासून इराणविरोधात युद्ध पुकारले. आता या संघर्षात युद्धविराम असला तरी गेल्या चार महिन्यांपासून हा संघर्ष सुरु आहे. अशात युद्ध रोखण्याच्या दिशेने ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’मध्ये झालेला ठराव महत्वाचा मानला जात आहे. या ठराव अधिक प्रभावी होण्यासाठी सिनेट आणि हाऊस या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर होणे आवश्यक आहे, असे रॉयटर्सच्या वृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे.

तरीही ट्रम्प यांच्याकडे विशेष अधिकार

इराण युद्ध रोखण्यासाठी ठराव झाला असला तरी ठराव बरखास्त करण्याचा अधिकार डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे असल्याचे अलजजिराने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. व्हाईट हाऊस व्हिटो पॉवरचा वापर करुन ठराव बरखास्त करु शकतात असे वृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे. अमेरिकी काँग्रेसमध्ये देखील या ठरावाला मंजुरी मिळण्याची शक्यता कमी असल्याने, या ठरावावर अनिश्चिततचे सावट आहे. यापूर्वी देखील मांडलेल्या युद्ध रोखण्याच्या ठरावांना मूर्त स्वरुप प्राप्त होऊ शकले नव्हते. दरम्यान, काँग्रेसमध्ये देखीस ट्रम्प यांना युद्धाला विरोध करणारे रिपब्लिकन सदस्या असल्याचे रॉयटर्सच्या वृत्तात म्हटले आहे.