US Iran Ceasefire Deadline: अमेरिका आणि इराण यांच्यातील दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची मुदत उद्या म्हणजेच बुधवारी समाप्त होत आहे. इराणबरोबर चर्चेसाठी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स इस्लामाबादला रवाना झाले असून, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील या चर्चेला हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चर्चा यशस्वी झाली आणि करारावर स्वाक्षरी करायची असल्यास डोनाल्ड ट्रम्प यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहतील किंवा ऑनलाईन पद्धतीने चर्चेत सहभागी होतील, असे रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
उद्याच्या चर्चेकडे सर्वांचे लक्ष
“दोन्ही देशांमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी जोरदार हालचाली सुरु आहेत. उद्याच (बुधवारी) चर्चा व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत”, असे पाकिस्तानी सूत्रांच्या हवाल्याने रॉयटर्सने वृत्त प्रसिद्ध केले आहे. उद्या युद्धविराम समाप्त झाल्यानंतर त्यात वाढ करण्याची शक्यता फार कमी असल्याचे सूचक वक्तव्य ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यामुळे उद्या इस्लामाबादमध्ये होणाऱ्या चर्चेतून तोडगा निघाला नाही तर संघर्ष अधिक तीव्र होण्याची भीती कायम आहे.
इराणकडून अद्याप स्पष्टता नाही
गेल्या आठवड्यात अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीत नाकेबंदीला सुरुवात केली आहे. नाकेबंदीमुळे होर्मुझ सामुद्रधुनीत प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या जहाजांना रोखले जात आहे. अमेरिकेने नाकेबंदी भेदून जाणाऱ्या इराणी जहाजावर हल्ला केला यानंतर इराणने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. शिवाय चर्चेत सहभागी न होण्याचा मानसही बोलून दाखवला. दरम्यान, रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार इराणी नेते या चर्चेकडे सकारात्मक पद्धतीने पाहत असून, पाकिस्तानमध्ये उपस्थिती लावण्याची शक्यता आहे.
पुन्हा चर्चा फिस्कटली तर?
दरम्यान, अमेरिका – इराण चर्चेबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे. इराणने अण्वस्त्र निर्मिती करु नये या मागणीवर अमेरिका ठाम आहे. दुसरीकडे इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीवर पूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी धडपड करत आहे. पण, यावेळी इराणने करार करण्यास नकार दिल्यास जबरदस्त परिणाम भोगावे लागतील असा इशार डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. त्यामुळे बुधवारी अमेरिका आणि इराण यांच्यात नक्की काय चर्चा होणार? संघर्षावर तोडगा निघणार का? की पुन्हा युद्ध पेटणार? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
