दुबई/ वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराणदरम्यान सध्या लागू असलेला तीन महिन्यांच्या शस्त्रसंधीला आणखी ६० दिवसाची मुदतवाढ देण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती झाली असून तसा तात्पुरता करार दृष्टिपथात आला आहे. याबरोबरच इराणच्या अणुकार्यक्रमावर चर्चा सुरू करण्याबाबतही सहमती झाली. त्यापूर्वी दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले केल्यामुळे पुन्हा एकदा शस्त्रसंधीबाबत शंका निर्माण झाल्या होत्या.

इराण व अमेरिकेच्या प्रतिनिधींदरम्यान गुरुवारी वाटाघाटी झाल्या. त्यामध्ये ही प्रगती झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अद्याप या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलेली नाही. त्यांच्या स्वाक्षरीनंतर शांतता चर्चा आणखी पुढे सरकण्याची आशा आहे. त्याचवेळी इराणने मात्र, अशा तात्पुरत्या कराराला अधिकृतपणे दुजोरा दिला नाही. दोन्ही देशांनी गुरुवारी एकमेकांना लक्ष्य केले होते. अमेरिकेने दक्षिण इराणवर हल्ले केले तर इराणने कुवेतमधील अमेरिकी तळावर क्षेपणास्त्र डागले. यादरम्यान, इस्रायलनेदेखील लेबनॉनमधील हेजबोला गटाविरोधात आघाडी उघडली.

अमेरिकेच्या लष्करी अधिकार्‍याने सांगितले, की इराणचे चार ड्रोन पाडण्यात आले असून, बंदर अब्बास येथील ड्रोन नियंत्रण कक्ष उद्ध्वस्त केले. येथून पाचवा ड्रोन अमेरिकी लष्करावर सोडण्याची तयारी सुरू होती. हे हल्ले संयमी, बचावात्मक होते आणि युद्धविराम कायम राहील, याची काळजी घेणारे होते, असे अमेरिकी लष्करी अधिकार्‍याने सांगितले. अमेरिकेकडून करण्यात आलेल्या हल्ल्याला जबाबदार असलेल्या तळाला लक्ष्य केल्याचे इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोअर’ने सांगितले.

दुसरीकडे, लेबनॉनमध्ये इस्रायलने हेजबोला गटाच्या पायाभूत सुविधांवर हल्ले केले. यात १४ जण ठार झाले. लेबनॉन आणि इस्रायलमध्ये शुक्रवारी वॉशिंग्टनमध्ये चर्चा होणार आहे. मात्र, तत्पूर्वीच हेजबोलावर हल्ले करण्याचा निर्णय इस्रायलने घेतला आहे.

‘इराणवरील निर्बंध कायम’

इराणबरोबर चर्चा करून समाधानी नसल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करारावर सहमती होण्यापूर्वी सांगितले. इराणवरील निर्बंध शिथिल करण्याचा अमेरिकेचा कुठलाही विचार नसल्याचे ते म्हणाले. तसेच, इराण आणि ओमान संयुक्तपणे होर्मुझ सामुद्रधुनीचे व्यवस्थापन करतील, यासंबंधी इराणने जारी केलेला आराखडा अनधिकृत असल्याचे ट्रम्प म्हणाले. होर्मुझवर कुठलाही एक देश नियंत्रण ठेवू शकत नाही. ओमानने यासंबंधी ऐकले नाही, तर त्यांच्यावरही हल्ला करू, असे ट्रम्प म्हणाले. ओमानने त्यावर आपली कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.