US Iran 60 Day MOU draft: अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धबंदी वाढवण्यासाठी आणि इराणच्या आण्विक कार्यक्रमावर पुन्हा चर्चा सुरू करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये एक प्राथमिक कराराच्या आराखड्यावर सहमती झाल्याचे वृत्त समोर आले आहे. परंतु या सामंजस्य कराराला अजूनही डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मंजुरी मिळालेली नाही. ’एएफपी’ या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. हा सामंजस्य करार केवळ एक तात्पुरती असून, कोणताही अंतिम शांतता करार नाही, अशीही माहिती समोर आली आहे.
६० दिवसांच्या सामंजस्य कराराच्या मसुद्यावर सहमती
‘अॅक्सिओस’च्या वृत्तानुसार, मंगळवारपर्यंत या कराराच्या आराखड्यावर काम करण्यात आले. करारातील बहुतांश बाबी मान्य झाल्या आहेत पण, दोन्ही बाजूंच्या वरिष्ठ नेतृत्वाने अद्याप याला अंतिम मंजुरी दिलेली नाही. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना या कराराच्या तपशिलांची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. पण, ट्रम्प यांनी यावर विचार करण्यासाठी दोन दिवस हवे आहेत, असे सांगितल्याचे ‘अॅक्सिओस’च्या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, दोन्ही बाजूंच्या मध्यस्थांनी या आठवड्याच्या सुरुवातीला ६० दिवसांच्या सामंजस्य कराराच्या मसुद्यावर सहमती दर्शवली आहे, असे सूत्रांच्या हवाल्याने ‘अॅक्सिओस’ने वृत्तात नमूद केले आहे.
या करारात काय आहे?
६० दिवसांच्या या करारात हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून मुक्त वाहतुकीचा समावेश करण्यात आला आहे. इराणला या महत्त्वाच्या जलमार्गावरून जाणाऱ्या जहाजांकडून टोल किंवा कर वसूल करता येणार नाही. शिवाय इराणला हॉर्मुझमधील सर्व सागरी सुरुंग हटवावे लागणर आहेत. हॉर्मुझमधील वाहतूक पूर्ववत होईल त्याच प्रमाणात अमेरिकेची नाकेबंदी टप्प्याटप्प्याने उठवली जाईल,असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. तसेच, इराणला आंतरराष्ट्रीय बाजारात मुक्तपणे कच्च्या तेलाची विक्री करता यावी यासाठी काही निर्बंधांमधून सूट देण्यास अमेरिकेने तयारी दर्शवली आहे.
विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा अपेक्षित
‘अॅक्सिओस’च्या वृत्तानुसार, या करारामध्ये इराण अण्वस्त्र तयार करण्याचा प्रयत्न करणार नाही याचाही समावेश असेल. या ६० दिवसांच्या युद्धबंदीच्या काळात, इराणच्या उच्च संवर्धित युरेनियमची विल्हेवाट कशी लावायची यावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. अमेरिकी मध्यस्थ आर्थिक निर्बंध उठवणे आणि इराणचा गोठवलेला निधी मुक्त करणे यावरही चर्चा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, युद्धबंदीच्या काळातही अमेरिकेकडून इराणवर हल्ला झाल्याने इराणने देखील प्रत्युत्तर देत अमेरिकी तळांवर हल्ला चढवला यामुळे संघर्ष पुन्हा चिघळून चर्चा फिस्कते का? अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे.
