US Iran Ceasefire breaking news updates: गेल्या महिन्याभराहून अधिक काळ चालू असलेले इराण-अमेरिका युद्ध दोन आठवड्यांसाठी थांबले आहे. अमेरिकेने इराणला दिलेल्या अल्टिमेटमनंतर आपली डेडलाईन संपण्याच्या ९० मिनिटे आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली. या युद्धविरामाच्या चर्चेत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे या घोषणेनंतर काही तासांतच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अमेरिका, त्यांचे मित्रराष्ट्र आणि इराणच्या अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी युद्धबंधीसाठी चर्चेला येण्याचे निमंत्रण दिले आहे.

पंतप्रधान शरीफ यांनी सांगितले की, लेबनॉनसह सर्वच ठिकाणी युद्धबंदी लागू करण्यास सर्व पक्ष सहमत झाले आहेत. इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये इराण समर्थित हिजबुल्ला विरोधात हल्ले सुरू केले होते, त्या पार्श्वभूमीवर ही घोषणा महत्त्वाची आहे. अत्यंत नम्रतेने मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, इराण आणि अमेरिका त्यांच्या मित्रराष्ट्रांसह लेबनॉन आणि इतर सर्व ठिकाणी तात्काळ युद्धबंदी लागू करण्यास तयार झाले आहेत.”

शरीफ यांच्या मते, ही शांतता चर्चा १० एप्रिलपासून इस्लामाबादमध्ये सुरू होणार आहे. “मी दोन्ही देशांच्या नेतृत्वाचे आभार मानतो आणि १० एप्रिल २०२६, शुक्रवार रोजी त्यांच्या शिष्टमंडळांना इस्लामाबादमध्ये चर्चेसाठी आमंत्रित करतो, जेणेकरून सर्व वादांवर ठोस तोडगा काढता येईल,” असे त्यांनी नमूद केले.

डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा काय?

ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ अकाऊंटवर या युद्धबंदीची घोषणा केली. विशेष म्हणजे, ट्रम्प यांनी इराणला पूर्णपणे नष्ट करण्याची धमकी दिल्यामुळे डेमोक्रॅट्सने त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती. ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटले, “पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार आणि त्यांच्या विनंतीवरून, मी इराणवर आज रात्री होणारा विनाशकारी हल्ला रोखण्यास तयार आहे. मात्र, इराणला ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) सुरक्षित आणि त्वरित खुली करावी लागेल. मी दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी इराणवरील बॉम्बफेक आणि हल्ले स्थगित करण्यास सहमत आहे.”

इराणची भूमिका काय?

तेहरानमध्ये इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने सांगितले की, त्यांनी दोन आठवड्यांच्या युद्धबंदीचा प्रस्ताव स्वीकारला आहे आणि ते शुक्रवारपासून इस्लामाबादमध्ये अमेरिकेसोबत चर्चा करण्यास तयार आहेत. हे युद्ध २८ फेब्रुवारी रोजी सुरू झाले होते, जेव्हा अमेरिका आणि इस्रायलने तेहरानवर हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यात सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी मारले गेले होते. प्रत्युत्तरादाखल इराणने इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरू केले, तसेच ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ रोखून धरली होती, ज्यामुळे या भागात ऊर्जा संकट निर्माण झाले होते.