US Iran War: होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिका आणि इराण यांच्यात मोठी चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. युद्धविरामाला एक महिना पूर्ण होत असताना ही घटना घडली आहे. होर्मुझमधून जाणाऱ्या तीन युद्धनौकांवर गुरुवारी इराणच्या लष्कराने हल्ला केल्याचा आरोप अमेरिकी सेंट्रल कमांडद्वारे करण्यात आला. इराणबरोबर शांतता चर्चा समाधानकारक आणि सकारात्मक पद्धतीने सुरु असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे ट्रम्प यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

“त्यांनी (इराण) करारावर स्वाक्षरी न केल्यास भविष्यात आम्ही त्यांच्यावर अतिशय भीषण हल्ले करु, अधिक तीव्र आणि आक्रमक पद्धतीने हल्ले केले जातील”, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. इराणला आण्विक कार्यक्रमासाठी परवानगी दिल्यास ते भविष्यात त्याचा वापर करतील, अशी भीती देखील ट्रम्प यांनी व्यक्त केली. दरम्यान, इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनीत करण्यात आलेला हल्ला अमेरिकी सैन्याने यशस्वीपणे परतवून लावला. यात युद्धनोकांचे काही नुकसान झाले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केली.

इराणकडून आरोप

अमेरिकेने नागरी वस्तीवर हल्ला केल्याचा आरोप इराणकडून करण्यात आला आहे. भूभागावर आणि होर्मुझ सामुद्रधुनीत प्रवेश करणाऱ्या दोन जहाजांवर अमेरिकेने हल्ला केल्याचा आरोप इराणने केला आहे. खरबदारी म्हणून तेहरानने सीमा भागात लष्करी कारवाईचा संशय व्यक्त करत हवाई संरक्षण प्रणाली कार्यान्वित केली आहे. या चकमकीनंतर अमेरिका आणि इराणने युद्ध पुढे वाढविण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर सध्या या भागात परिस्थिती सामान्य असल्याचे इराणी माध्यमांनी म्हटले आहे.

शांतता चर्चेची स्थिती काय?

अमेरिका आणि इराणमध्ये सध्या शांतता चर्चा प्रगती पथावर असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून केला जात आहे. दोन्ही देशातील संघर्षाला कायमाचा पूर्णविराम देऊन, गल्फ प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याचा मानस आहे. उभय देशातील शांतता चर्चेची प्रामुख्याने तीन टप्पे विचाराधीन आहेत. युद्धविराम, होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावावर कायमस्वरुपी तोडगा काढणे आणि ३० दिवसांच्या शस्त्रसंधीच्या काळात संघर्ष समाप्त करण्यासाठी करार करणे. पण, या करारात वारंवार अडथळे निर्माण होत असून, तोडगा निघण्यास अडचण येत आहे.

अमेरिका भूमिकेवर ठाम

इराणने अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे बंद करावा आणि होर्मुझ सामुद्रधुनीतून विनाअडथळा वाहतूक सुरु राहील याची खात्री द्यावी या मागणीवर अमेरिका ठाम आहे. तर इराण अण्वस्त्र कार्यक्रमावर भविष्यात चर्चा करता येईल असा युक्तिवाद करत अमेरिकेला होर्मुझमधील नाकेबंदी हटविण्याची मागणी करत आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी आता इराणाला जबरदस्त कारवाईचा इशारा दिला आहे. करार झाला नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता इराणच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष लागले आहे.