Israel-Iran Conflic : इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांची इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या संयुक्त हल्ल्यात हत्या करण्यात आली आहे. खामेनी यांच्यावर अंत्यसंस्कार देखील झालेले नाहीत, त्याआधीच इस्रायलने बुधवारी खामेनी यांच्या जागी निवडला जाणारा त्यांचा कोणताही उत्तराधिकारी हा इजरायलच्या निशाण्यावर असेल. इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधी पोस्ट केली आहे.
एएफपी वृत्तसंस्थेने अधिकृत वृत्तसंस्था Irna च्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, इराणमध्ये खामेनी यांच्यावरील अंत्यसंस्कार हे तीन दिवस चालणार आहेत. “रात्री १०:०० वाजता (1830 GMT) निष्ठावान लोक तेहरानमधील इमाम खोमेनी ग्रँड मशीद येथे भेट देऊन देशाच्या शहीद मार्गदर्शकाच्या पार्थिवाला अखेरची निरोप देऊ शकतील”, अशी माहिती Irna ने इस्लामिक डेव्हलपमेंट को-ऑर्डिनेशन कौन्सिलच्या निवेदनाचा हवाल्याने दिली आहे. खामेनी यांचे पार्थिव ईशान्य इराणमधील त्यांचे मूळ शहर असलेल्या मशहदमध्ये दफन केले जाईल.
आयातुल्ला खामेनी यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांचे पुत्र मोजतबा खामेनी यांची निवड करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ (Israel Katz) यांनी बुधवारी खामेनी यांचा उत्तराधिकारी म्हणून निवडल्या जाणाऱ्या कोणत्याही इराणी नेत्याची ते हत्या करतील अशी धमकी दिली आहे.
“इस्रायलचा विनाश करण्याच्या योजनेचे नेतृत्व करण्यासाठी इराणच्या दहशतवादी राजवटीद्वारे निवडलेला कोणताही नेता, जो अमेरिकेला, मुक्त जगाला आणि या प्रदेशातील देशांना धमकावेल आणि इराणी जनतेवर दडपशाही करेल, तो हत्येचे निश्चित असे लक्ष्य असेल, मग त्याचे नाव काहीही असो किंवा तो कुठेही लपलेला असो,” असे काट्झ यांनी एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
खामेनी यांच्या हत्येनंतर त्यांची जागा कोण घेणार याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू असतानाच मंगळवारी रात्री उशिरा आयातुल्ला खामेनी यांचे पुत्र मोजतबा यांना उत्तराधिकारी म्हणून निवडण्यात आले वृत्त इस्रायली मीडियाकडून देण्यात आले. त्याानंतर ही धमकी देण्यात आली आहे.
“पंतप्रधानांनी आणि मी ‘ऑपरेशन लायन्स रोअर’च्या उद्दिष्टांचाच एक अविभाज्य भाग म्हणून हे मिशन पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व मार्गांनी तयारी आणि कृती करण्याचे निर्देश आयडीएफला दिले आहेत,” असे इस्रायली संरक्षण मंत्र्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
“आम्ही आमच्या अमेरिकन भागीदारांबरोबर मिळून या राजवटीच्या सर्व क्षमता नष्ट करण्यासाठी आणि इराणी लोकांना ती उलथवून टाकता आणि ती बदलता यावी यासाठीची परिस्थिती निर्माण करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करत राहू,” असेही ते म्हणाले.
एका वरिष्ठ इस्रायली अधिकाऱ्याने Ynet न्यूजशी बोलताना सांगितले की, मोजतबा खामेनी यांची उत्तराधिकारी म्हणून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, इराणच्या अधिकृत सरकारी माध्यमांकडून याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी मिळालेली नाही.
